कोल्हापूर शहरात विद्यार्थ्यांचे शंभर टक्के लसीकरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोल्हापूर महापालिकेच्या वतीने 3 जानेवारीपासून शहरात शाळा व महाविद्यालयांतील 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेले लसीकरण मंगळवारी शंभर टक्के पूर्ण झाले आहे. या वयोगटात विद्यार्थांसाठी आयोजित केलेल्या विशेष लसीकरण शिबिरात तब्बल 28 हजार 802 विद्यार्थांचे लसीकरण करण्यात आले आहे. दरम्यान, 122 हेल्थ केअर वर्कर, 53 फ्रंटलाईन वर्कर व 60 वर्षांवरील व्याधिग्रस्त 124 अशा 299 नागरिकांना कोरोना लसीचा बूस्टर डोस देण्यात आला आहे.

कोल्हापूर शहरात मंगळवारी महाविद्यालय व शाळेतील 15 ते 18 वयोगटातील 663 विद्यार्थांचे लसीकरण करण्यात आले. सकाळी 9 ते 11 या कालावधीत शहरात दोन महाविद्यालयांत ही विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात आली. यामध्ये चाटे हायस्कूल माध्यमिकमध्ये 163 व आयटीआय कॉलेज, कळंबा येथे 500 विद्यार्थांचे लसीकरण करण्यात आले. बुधवारी शाहू दयानंद हायस्कूल, कोल्हापूर हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, देशभूषण विद्यामंदिर हायस्कूल, श्रीमंत माईसाहेब बावडेकर माध्यमिक विद्यालय, आर. के. वालावलकर प्रशाला येथे 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. तसेच, सकाळी 8 ते रात्री 9 या वेळेत सर्व प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रांत 18 वर्षांवरील नागरिकांना कोविड लसीच्या पहिल्या व दुसऱया डोसकरिता ऑन द स्पॉट नोंदणीद्वारे लसीकरण करण्यात येत आहे.

शहरात 2 हजार 188 नागरिकांचे लसीकरण
महानगरपालिका प्राथमिक आरोग्य केंद्रात 2 हजार 188 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. यामध्ये हेल्थ केअर वर्कर्स 154, फ्रंटलाईन वर्कर्स 78, तर 15 ते 18 वर्षांपर्यंत 317, 18 ते 45 वर्षांपर्यंत 1 हजार 63, 45 ते 60 वर्षांपर्यंत 276 व 60 वर्षांवरील 246 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. शहरात मंगळवारअखेर 6 लाख 80 हजार 687 आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाईन वर्कर्स व नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.