गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती मंगेशकर कुटुंबीयांच्या प्रवक्त्यांनी आज दिली.लता मंगेशकर (92) यांना कोरोनासह न्युमोनियाची लागण झाली असून त्यांच्यावर 9 जानेवारीपासून ब्रीच कँडी रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.
‘लतादीदी यांची प्रकृती आता स्थिर आहे. त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. डॉक्टरांनी परवानगी दिल्यानंतरच त्या घरी परततील,’ अशी माहिती मंगेशकर कुटुंबाच्या प्रवक्त्या अनुषा श्रीनिवास यांनी दिली. ‘त्या लवकरच घरी परताव्या यासाठी प्रार्थना करा,’ असे आवाहन त्यांनी लतादीदींच्या चाहत्यांना केले आहे. लतादीदी यांचे वय जास्त असल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यापूर्वी डॉक्टरांना त्या पूर्णपणे बरे झाल्याची खात्री करून घ्यायची आहे, अशी माहिती मिळत आहे.




























































