Goa Election 2022 – शिवसेनेचे नऊ उमेदवार जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

गोवा विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने आज आपल्या नऊ उमेदवारांची यादी जाहीर केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुभाष वेलिंगकर यांचे पुत्र शैलेश वेलिंगकर यांना शिवसेनेने पणजीतून उमेदवारी दिली असून उत्पल पर्रीकर हे पणजीतून अपक्ष म्हणून रिंगणात उतरले तर आम्ही आमचा उमेदवार मागे घेऊन त्यांना पाठिंबा देऊ, असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी सांगितले.

खासदार राऊत यांनी गोव्यातील शिवसेना उमेदवारांची यादी एका भरगच्च पत्रकार परिषदेत जाहीर केली. पेडणे येथून सुभाष केरकर, म्हापसातून जितेश कामत, शिवोली, विन्सेंट परेरा, हळदोणे –  गोविंद गोवेकर, पणजी – शैलेश वेलिंगकर, पर्ये – गुरुदास गावकर, वाळपई – देविदास गावकर, वास्को – मारुती शिरगावकर आणि केपे मतदारसंघातून अॅलेक्सी फर्नांडिस यांना शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. गोव्यातील भ्रष्ट सरकारला घरी बसवायचे असेल तर सामान्य लोकांना संधी मिळाली पाहिजे. शिवसेनेने कायम नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. भाजप विरोधात गोव्याच्या जनतेत प्रचंड असंतोष असून कोणत्याही परिस्थितीत भाजप पुन्हा सत्तेवर येणार नाही असे खासदार संजय राऊत यांनी ठामपणे सांगितले.

उत्पल बद्दल बोलताना ते म्हणाले, भाजपने कुणाला तिकीट द्यावे हा त्यांचा प्रश्न आहे. उत्पल पर्रीकर यांना घराणेशाहीच्या नावावर तिकीट नाकारले असले तर भाजपने पणजी आणि इतर मतदार संघात घराणेशाहीला वाव का दिला आहे.

राऊत यांच्या उपस्थिती मध्ये परशुराम गोमंतक सेनेचे प्रमुख शैलेश वेलिंगकर यांना आज शिवसेनेमध्ये प्रवेश देण्यात आला.वेलिंगकर यांना राज्य उपाध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले.

यावेळी शिवसेना उपनेते खासदार अरविंद सावंत, शिवसेना सचिव सूरज चव्हाण, आमदार सुनील शिंदे यांच्यासह अनेक शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.