
>> प्रशांत गौतम
मराठी बालरंगभूमीच्या इतिहासाची सुरुवात संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात सोयगाव येथे नरश्रेष्ठ केशवराव ऊर्फ लोटू पाटलांच्या भरीव व ठसठशीत योगदानापासून झाली. त्याला अनेक अर्थांनी आजही महत्त्व प्राप्त झालेले आहे. मराठवाड्यात स्वातंत्र्यपूर्व काळापासून बालनाट्याची चळवळ सुरू होती. स्वातंत्र्यानंतर तिचा विस्तार झाला.
1940 च्या सुमारास जालना जिल्ह्यातील सेवली येथे ग्रामीण भागातील हौशी कलावंतांनी एकत्र येऊन ‘अरुणोदय संगीत मंडळी’ची स्थापना केली होती. बालकलाकारांसाठी असलेल्या या छोट्या नाट्य मंडळाची इतिहासात नोंद नाही. याच काळात तत्कालीन परभणी जिल्ह्यातील कळमनुरी येथे मधुकरराव पेंडसे हे शिक्षक व बालनाट्याचे दिग्दर्शक होते. जिल्हा पातळीवरील बालनाट्यात अनेक बालकलावंत सहभागी होत. यातीलच एक महत्त्वाचे बालकलावंत म्हणजे ज्येष्ठ कवी प्रा. फ. मु. शिंदे होत. नववीच्या वर्गात असताना त्यांना अभिनयाचे पारितोषिक मिळाले होते. परभणी येथेही स्वातंत्र्यपूर्व काळापासून बालनाट्याची चांगली परंपरा आहे. श्रीगणेश मेळाव्यात मोठ्या नाटकांप्रमाणे बालनाट्येही सादर होत असत. 1940 ते 1945 या कालावधीत बी. रघुनाथांचे समकालीन असणारे सा. ‘दीपप्रभा’चे संपादक वि. भा. पाठक गुरुजी यांनी अनेक बालनाट्ये लिहून सादर केली. 1950 मध्ये मराठवाड्याच्या विविध भागांत बालनाट्ये होत असत. 1960 या दशकभराच्या कालखंडाने ही चळवळ म्हणून सक्रिय ठेवण्यात मोठा पल्ला गाठला आणि येथूनच पुढील काळ हा स्वातंत्र्यानंतरची बालनाट्य चळवळ असाही समजला जाऊ लागला. 1950 च्या सुमारास सोयगावचे नटश्रेष्ठ लोटू पाटलांनी या बालनाट्य चळवळीस गती दिली. श्रीराम थिएटर्स संगीत मंडळाची स्थापना होताच नेकजात मराठा, पुंडलिक, देवमाणूस अशी संस्कारक्षम बालनाट्ये त्यांनी बसवली.
मराठवाड्याचा पहिला स्वातंत्र्यदिन 17 सप्टेंबर 1948 रोजी फोकानिया (आताचे जि.प. हायस्कूल) येथे झाला. त्यानिमित्त संभाजीनगरातील कलावंतांनी ‘निशिकांतची नवरी’ हे तीन अंकी बालनाट्य सादर केले. यात नवरीची भूमिका लोकसाहित्याचे गाढे अभ्यासक व सध्या नव्वदीत असलेल्या डॉ. प्रभाकर मांडे यांनी केली होती. या बालनाट्यास श्रीनिवास धोंगडे यांचे दिग्दर्शन होते. शाळेचे उपमुख्याध्यापक गणेश थत्ते यांनी मौलिक मदत केली होती. संभाजीनगरच्या रंगभूमीवरील पहिले बाल नाटककार अशी ज्यांची ओळख आहे, त्या डॉ. शंकरलाल पुरकर यांनीही बालरंगभूमी, बालनाट्य यांच्या संदर्भाने गांभीर्याने विचार केला. कमलाकरराव मुळे हे त्या काळातील प्रसिद्ध बालनाट्य लेखक होते. विविध शालेय कार्यक्रमांतून ते बालनाटिका सादर करीत असत. ‘तोफेच्या तोंडी’ हे शिवचरित्रावर आधारित त्यांचे बालनाट्य बरेच गाजले होते. शैलजा नागोराव पत्की (कविता विजय निरखी) या नांदेडहून संभाजीनगरला आल्या. त्यांनी ‘हं हं हं आणि हं हं हं’ हे बालनाट्य सादर केले. त्यात प्रशांत दळवी, दिलीप यार्दी हे बालकलावंत म्हणून सहभागी होते. नंतरच्या काळात मराठवाड्यात बालनाट्याची चळवळ पुढे नेण्यात दिगंबर गोसावी, सूर्यकांत सराफ, श्रीराम बडे, कुमार देशमुख यांच्या सारख्यांनी मदत केली. नंतर वसंत व माधुरी दातार, कमलाकर सोनटक्के, कांचनताई सोनटक्के यांचे योगदान लाभले. गोसावी बालनाट्य बसवत आणि त्याचे मूलभूत प्रशिक्षणही देत असत. श्रीराम बडे यांनी बालनाटय़ाची चळवळ व्यावसायिक करण्यात उत्तम योगदान दिले. सूर्यकांत सराफ जालना येथे असतानाच ‘नाट्यांकुर’ची स्थापना केली. संभाजीनगरात आल्यावर ‘शिल्पकार’ची स्थापना केली. दोन्ही संस्थांमधून त्यांनी बालरंगभूमीच्या अभिवृद्धीसाठी ठसठशीत योगदान दिले.
सध्या मराठवाड्याच्या बालरंगभूमीवर बीड येथील डॉ. सतीश साळुंके यांची ‘परिवर्तन’ नाट्य संस्था, नांदेड येथील नाथा चितळे यांनी ‘तन्मय’, संभाजीनगर येथील रमाकांत मुळे यांची ‘स्नेहांकित’, अभय कुलकर्णी, विजय शिंदे यांची ‘पंचमवेद’ या संस्था तसेच बीड येथील प्राचार्या दीपा क्षीरसागर, जोसेफ अन्सारी सनी क्लब, डॉ. राजू सोनवणे, प्रा. केशव भागवत, प्रा. तन्मय शेलार, प्रा. विनोद दळवी, राहुल जोंधळे, नागश कुलकर्णी, त्र्यंबक वडसकर, अरुण सरवदे व त्यांच्या संस्था योगदान देत असतात. त्याचप्रमाणे संभाजीनगरात वंदना देशमुख, धनंजय सरदेशपांडे, गिरीधर पांडे, श्रीकांत सराफ, दासू वैद्य, जालना येथे रेखा बैजल, डॉ. प्रभाकर शेवडे, मुकुंद दुसे, संजय पावडे, दिनेश संन्याशी, कविता नरवडे, संजय टिकारिया यांचा उल्लेख प्रातिनिधिक स्वरूपात करावा लागेल. विशेष म्हणजे संजय टिकारिया यांनी पंधरा बालनाटय़ांचे लेखन करून सादरही केली.
बीड जिल्ह्यात साधारणपणे 1955 ते 1960 या कालावधीत बालनाट्याची चळवळ सुरू झाली. तेथील संगीतज्ञ व्यंकटराव बब्रास हे शिक्षक होते. शाळेत बालनाटिका बसवत शिक्षण विभागाच्या वतीने बालनाट्य स्पर्धा आयोजित होत असत. तेथील रंगकर्मी विजय क्षीरसागर, पुरुषोत्तम खोपरीकर, कन्हैया गवळी यांची ‘आग्र्याहून सुटका’ या बालनाट्यात भूमिका केल्या होत्या. 1975 च्या सुमारास सहावीत असताना डॉ. सतीश साळुंके यांनी ‘आहुती’ या बालनाटय़ात सिद्दी जौहरची भूमिका केली होती. त्यासाठी त्यांना बालनाट्यातील अभिनयासाठी पारितोषिक मिळाले होते. आज त्याच साळुंके यांनी मराठवाड्याची बालरंगभूमी महाराष्ट्रभर पोहोचवली. त्याचप्रमाणे परळी, धारूर आणि अंबाजोगाई येथेही बालनाट्याची चळवळ वाढली. अंबाजोगाई येथे योगेश्वरी विद्यालय स्थापन झाल्यापासूनच बालरंगभूमीची चळवळ सुरू झाली. तेथील गणपत व्यास, रामभाऊ मुकदम, संतोष मुळावेकर, मंगला कुलकर्णी, दत्ता मुकदम, कृष्णा भोकरे, श्रीरंग सुरावसे, प्रा. संपदा कुलकर्णी, मंगला घोडेकर यांनी योगदान दिले. 1980-81 च्या काळात श्रीराम व रश्मी बडे यांनी बालनाट्यचे प्रशिक्षण शिबीर घेतले. धारूर येथील असिफ अन्सारी यांच्या मार्गदर्शनामुळे सय्यद यांचा नाट्यप्रवास एनएसडीपर्यंत गेला. धारूर येथे 1980-85 या काळात शेख गुरुजींनी बालनाट्या चळवळीत योगदान दिले. धाराशीव येथे 1950 पासून बालनाट्ये सुरू होती. तेथील बसवेश्वर घोडके हे हरहुन्नरी नाट्य कलावंत होते. 1952 साली त्यांनी सहावीत असताना ‘स्वराज्याचे तोरण’ या पाठ्यपुस्तकातील धड्याचे नाट्य रूपांतर केले. सातवीत असताना ‘जंगल्या भिल्ल’मध्ये तर नववीत असताना संगीत ‘गुरुदक्षिणा’ सादर केले. त्याआधी आठवीत असताना महाराणा प्रतापची भूमिका केली. पुढे ते नांदेड येथे स्थायिक झाले. लातूर येथील सुनीता कुलकर्णी यांनी कर्णबधिर मुलांसाठी गोपी, त्सुनामी, एक दिवस बंडाचा, खिचडी, बाहुली, हुंकार, बुजगावणं अशी बालनाट्ये लिहून सादर केली. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत बालरंगभूमीसाठी पोषक वातावरण लाभल्याचे दिसले. संगीत ‘संशयकल्लोळ’मध्ये फाल्गुनरावच्या भूमिकेत नटवर्य लोटू पाटील.





























































