
विद्यार्थ्यांना शिक्षकाचा ओरडा ही तशी सामान्य बाब आहे. पण, विद्यार्थ्यांवर ओरडल्यामुळे हाकललेल्या एका प्राध्यापिकेने न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयानेही तिच्या बाजूने निर्णय देत विद्यापीठाला दंड ठोठावला आहे.
हे प्रकरण ब्रिटनच्या एक्सेटर विद्यापीठातला आहे. या विद्यापीठात एनेट प्लाट नावाची महिला 29 वर्षांपासून भौतिकशास्त्र शिकवते. मात्र, एक दिवस तिला विद्यापीठाने कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा धक्का बसलेल्या महिलेने या निर्णयामागचं कारण विचारलं.
तेव्हा विद्यापीठाने तिला विद्यार्थ्यांवर खेकसून बोलायची सवय असल्याने तसंच मोठ्या आवाजामुळे नवीन विद्यार्थ्यांना त्रास होत असल्याने तिला विद्यापीठातून काढल्याचं सांगितलं.
विद्यापीठाच्या या निर्णयाविरोधात महिलेने कोर्टात धाव घेतली. कोर्टात मात्र, विद्यापीठाने आपल्या आरोपांपासून पलटून वेगळेच आरोप केले. एनेटला तिच्या आवाजाऐवजी तिने पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांशी केलेल्या गैरवर्तनामुळे तिला विद्यापीठाबाहेर काढल्याचा युक्तिवाद करण्यात आला. तिला यापूर्वीही दोन वेळा निलंबित करण्यात आलं असून ती तणावासाठी औषधं घेते. तसंच, तिला एखाद्या व्यक्तिशी कसं बोलावं, याची अजिबात जाणीव नाही, असंही विद्यापीठाने म्हटलं.
दुसरीकडे महिलेनेही तिची बाजू मांडली. आपण विद्यार्थ्यांवर खेकसत नाही. आपला आवाज मोठा असल्याने पट्टी वाढवल्याचं कळत नाही. आपल्या कुटुंबातील बहुतेकांचा आवाज असाच आहे. यापूर्वीही दोन ठिकाणी आपण प्राध्यापिकेची नोकरी केली आहे. पण, कुठेही असं झालं नाही. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने विद्यापीठाला फटकारत प्राध्यापकाच्या बाजूने निकाल दिला.
विद्यापीठाने जी वागणूक महिलेला दिली आहे, ती चुकीची असून त्याची नुकसान भरपाई म्हणून तिला विद्यापीठाने 1 कोटी रुपये द्यावेत, असे आदेश न्यायालयाने विद्यापीठ प्रशासनाला दिले.




























































