सामना अग्रलेख – हवामान बदलाची ‘तऱ्हा’!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मागील वर्षी महाराष्ट्राला अवकाळी, महापूर, ढगफुटी, चक्रीवादळे अशा अस्मानी संकटांचे तडाखे बसले. त्यामुळे खरीप हंगामाचे मोठे नुकसान झाले. रब्बी पिकांकडे बळीराजाने आशेने पाहिले, मात्र विचित्र हवामानाची ‘दृष्ट’ या पिकांना लागली आहे. कधी ढगाळ हवामान, कधी दाट धुके, कधी अवकाळी पाऊस तर कधी चक्रीवादळ असे हे दुष्टचक्र सुरूच आहे. त्यात पाकिस्तानकडून आलेल्या धुळीच्या वादळाची भर पडली आहे. हवामान बदलाची ही तऱ्हा आणखी किती काळ कायम राहणार हे त्या निसर्गालाच ठाऊक.

देशात आधीच ओमायक्रोन या कोरोना व्हेरिएंटची तिसरी लाट उग्ररूप धारण करीत आहे. शनिवारी देशभरातील नवीन कोरोना रुग्णांची संख्या तीन लाख 30 हजारांवर पोहोचली. शिवाय ओमायक्रोनच्या ‘सामुदायिक प्रसारा’ला (कम्युनिटी प्रेड) सुरुवात झाल्याचा इशाराच तज्ञांनी दिला आहे. एकीकडे ओमायक्रोनची लाट, दुसरीकडे पाकिस्तानकडून गुजरातमार्गे महाराष्ट्र, राजस्थानवर धडकलेले धुळीचे वादळ, तर तिसरीकडे दोन दिवसांत पुन्हा झालेले विचित्र हवामान अशा तिहेरी संकटात सध्या मुंबई-महाराष्ट्रासह देश सापडला आहे. मागील महिनाभरापासून कुठे थंडीची लाट, कुठे अवकाळी पाऊस, कुठे दाट धुके तर कुठे आणखी काही असे विचित्र हवामान दिसून येत आहे. महाबळेश्वर, दापोली, खेड, चिपळुणात शनिवारी पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे आधीच घसरलेला पारा आणखी खाली गेला. कोकण, मुंबई, पुणे आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती ती खरी ठरली. त्यात आता पाकिस्तानातून आलेल्या धुळीच्या वादळाची भर पडली आहे. मुंबई, पुण्यात रविवारपासूनच या वादळाचा प्रभाव दिसून आला. या शहरांवर

‘धुक्याची चादर’

पसरल्याचा भास होत होता. ही सगळी परिस्थिती शेतीबरोबरच मानवी आरोग्यासाठीही धोकादायक ठरणार आहे. गेल्या महिन्यात अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर अशा दोन्ही ठिकाणी एकाच वेळी कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने राज्यात अनेक ठिकाणी पाऊस झाला होता, तर थंडी गायब झाली होती. नंतर हवामानात पुन्हा बदल झाला. हवेतील गारठा, थंडी सर्वत्र वाढली. डिसेंबर महिन्यात पुन्हा हवामानाने विचित्र वळण घेतले. कोकणवर अवकाळीचा मारा झाला. त्यामुळे आंबा आणि काजू उत्पादकांची काळजी वाढली आहे. विदर्भातील शेतकरीही हवामानातील सततच्या बदलांमुळे मेटाकुटीला आला आहे. नाशिकमधील कांदा आणि द्राक्ष उत्पादकांची अवस्था वेगळी नाही. निसर्गाच्या लहरीपणाचा तडाखा प्रत्येकच महिन्याला पिकांना बसत आहे. त्यामुळे रब्बी हंगामही धोक्यात आला आहे. हवामानात सतत होत असलेल्या बदलांमुळे गहू, हरभरा यांसारख्या पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. धुके आणि ढगाळ वातावरणामुळे कांद्याची ‘लाली’ कमी होत असून कांदे पिवळसर पडत आहेत. अनेक शेतकऱयांवर आधीची रोपे खराब झाल्याने नवीन रोपे विकत घेऊन ‘उन्हाळी कांद्या’ची लागवड करण्याची वेळ आली आहे. खराब वातावरणामुळे

द्राक्षांचा गोडवा कमी

होण्याच्या भीतीने द्राक्ष उत्पादकाला ग्रासले आहे. द्राक्षांचा हंगाम आता अंतिम टप्प्यात आहे. औषधांचा मारा करून जगविलेले द्राक्षपीक ऐन मोक्यावरच संकटात आल्याने द्राक्ष उत्पादकांची अवस्था बिकट झाली आहे. मागील वर्षी महाराष्ट्राला अवकाळी, महापूर, ढगफुटी, चक्रीवादळे अशा अस्मानी संकटांचे तडाखे बसले. त्यामुळे खरीप हंगामाचे मोठे नुकसान झाले. त्यात कोरोनाची दुसरी लाट, नंतरचे लॉक डाऊन यामुळे होते-नव्हते ते पीकही बळीराजाला मार्गी लावणे अवघड गेले. रब्बी पिकांकडे बळीराजाने आशेने पाहिले, मात्र विचित्र हवामानाची ‘दृष्ट’ या पिकांना लागली आहे. कधी ढगाळ हवामान, कधी दाट धुके, कधी अवकाळी पाऊस तर कधी चक्रीवादळ असे हे दुष्टचक्र सुरूच आहे. त्यात पाकिस्तानकडून आलेल्या धुळीच्या वादळाची भर पडली आहे. हवामान बदलाची ही तऱ्हा आणखी किती काळ कायम राहणार, त्यामुळे किती संकटे बळीराजाला झेलावी लागणार हे त्या निसर्गालाच ठाऊक. मात्र ही अनिश्चितता आणि अनियमितता लक्षात घेऊनच शेतीचे गाडे यापुढील काळात हाकावे लागणार हे नक्की.