
चौथीच्या मुलीला खाऊचे आमिष दाखवून अत्याचार करणाऱया नराधमाला 10 वर्षे सक्तमजुरी व 50 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. पाटील यांनी हा निकाल दिला. ओंकार ऊर्फ बंडय़ा आनंदा दाभाडे (रा. शाहुपुरी) असे आरोपीचे नाव आहे.
15 सप्टेंबर 2018 रोजी शाळेला गणपतीची सुट्टी असल्याने तसेच आजी बाहेर कामाला गेल्याने पीडित मुलगी घरी एकटीच होती. दाभाडे याने पेरू आणण्यासाठी 5 रुपये देतो असे सांगून तिच्यावर अत्याचार केला. आजी आल्यानंतर हा प्रकार समोर आला. याप्रकरणी पीडितेच्या आजीने शाहुपूरी पोलीस ठाण्यात ओंकार दाभाडे विरोधात फिर्याद दिली होती.
या खटल्यात पीडित मुलगी, फिर्यादी आजी, पंच साक्षीदार व डॉक्टरांच्या साक्षी तसेच, आरोपीचा वैद्यकीय दाखला महत्त्वाचा पुरावा ठरला. सरकारी वकील मंजुषा पाटील यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने शिक्षा ठोठावली.



























































