रेशन कार्डचे अपडेट आता मोबाईलवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ग्राहकसेवेमध्ये सुलभता आणण्यासाठी आता रेशन कार्डाशी संबंधित सर्व अपडेट आता मोबाईलवरदेखील उपलब्ध होणार आहेत. ग्रामीण भागामध्ये असणाऱ्या नेटवर्कची अडचण लक्षात घेता रेशन कार्डशी संबंधित महत्त्वाच्या अपडेट्स रेशन कार्डधारकांना ‘एसएमएस’वरदेखील पाठवल्या जाणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सचिन ढोले यांनी दिली.

मेरा रेशन अॅप, एक देश एक रेशन कार्ड या योजनेअंतर्गत लाभधारक आता आपला रेशन कार्ड नंबर टाकून रजिस्टर करू शकतात. रेशन कार्डमध्ये कोणाकोणाचे नाव आहे, कोणाचे आधार कार्ड रेशन कार्डला लिंक आहे का? तसेच जवळच्या दुकानदाराचे नाव, पत्ता, अंतर हेदेखील समजू शकेल. रेशन कार्ड स्थलांतर केल्यानंतर आपण कोणत्या धान्यासाठी पात्र आहात. आपल्या लगतच्या परिसरातील रेशन दुकानाचा पत्ता समजू शकेल तसेच दुकानादाराशी संबंधित काही तक्रार असल्यास तीदेखील नोंदविता येईल.

गेल्या सहा महिन्यांत आपल्या रेशन कार्डवरून किती धान्य घेतले, रेशन कार्ड स्थलांतर केल्यानंतर तुम्ही कोणत्या धान्यासाठी पात्र आहात ? नव्या रेशन कार्डसाठी ऑनलाईन अर्ज करणे. हे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतरित झाल्यास रेशन कार्ड ट्रान्सफर करणे, या सुविधादेखील उपलब्ध होणार आहेत.

जिल्हा पुरवठा अधिकारी सचिन ढोले म्हणाले, रेशन कार्ड पोर्टेबिलिटी सेवा गेल्या जूनपासून सुरू झाली. या योजनेंतर्गत तुम्ही कोणत्याही राज्यात राहून रेशन खरेदी करू शकता. ही योजना महाराष्ट्रामध्ये आधीपासूनच लागू केलेली आहे. पुणे जिल्ह्यामध्ये ‘अंत्योदय योजने’अंतर्गत 2 लाख 19308 आणि ‘प्राधान्य सेवना योजने’अंतर्गत 24 लाख 91 हजार 851 रेशन कार्डधारक आहेत. त्यांना या सेवेच्या माध्यमातून लाभ घेता येईल.