
>> प्रसाद फाटक
रक्तदानाबद्दल समाजामध्ये मोठी जागरुकता घडून आली आहे, पण रक्तदानाच्या माध्यमातून रक्तदाता आणि गरजू या दोघांचे नाते जोडणाऱ्या रक्तपेढीचे महत्त्व मात्र आजही समाजापर्यंत म्हणावे तितके पोहोचलेले नाही. अशा परिस्थितीमध्ये महेंद्र वाघ यांच्या ‘ऋणानुबंध रक्ताचे’ या पुस्तकाने ‘रक्तदान’ या विषयाचे असंख्य पैलू लोकांसमोर आणण्याचे महत्त्वाचे काम केले आहे.
रक्तदात्याने रक्तदान केल्यापासून रुग्णाला रक्त चढवले जाईपर्यंतची प्रक्रिया अतिशय गुंतागुंतीची आणि जोखमीची असते. रक्तदान – रक्त साठवण – रक्त जुळवणी – रक्त संक्रमण अशी ही मोठी साखळी असते. एखाद्या टप्प्यात झालेली थोडीशी हलगर्जीही रुग्णाच्या जीवावर बेतू शकते. ही जबाबदारी कशी पार पाडली जाते, याची शास्त्रीय माहिती या पुस्तकामध्ये वाचायला मिळते. जेव्हा एखाद्या व्यक्तीला रक्ताची गरज आहे असे म्हटले जाते तेव्हा प्रत्यक्षात त्या व्यक्तीला रक्तामधल्या लाल रक्तपेशी, रक्तबिंबिका (प्लेटलेट्स), रक्तरस (प्लाझ्मा) आणि क्रायो प्रेसिपिटेट यापैकी एखाद्या घटकाची गरज असते. या घटकांचे महत्त्व, रक्तगटांचे प्रकार, रक्तपेढीमध्ये वापरली जाणारी आधुनिक उपकरणे यांची माहिती महेंद्र वाघ यांनी सर्वसामान्य वाचकांना कळेल अशा सोप्या शब्दांमध्ये उलगडून सांगितली आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या योजनेतून 1983 साली पुण्यामध्ये ‘जनकल्याण रक्तपेढी’ची स्थापना झाली. डॉ. शरद जोशी, वैद्य दादा खडीवाले, डॉ. दिलीप वाणी, आप्पासाहेब वज्रम, डॉ. अविनाश वाचासुंदर या सर्वांनी काया-वाचा-मनाने रक्तपेढीचे कार्य वृद्धिंगत केले. सामाजिक भान आणि व्यावसायिक शिस्त यांचा उत्तम मिलाफ साधत रक्तपेढीने रुजवलेल्या कार्यसंस्कृतीची पुस्तकाच्या पानापानांमधून प्रचीती येते. प्रशिक्षण, प्रबोधन, समुपदेशन या आघाड्यांवर जनकल्याण रक्तपेढीचे कार्य अतिशय काटेकोर, नियोजनबद्ध आहे.
रक्त साठवणुकीसाठी, पृथक्करणासाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देणे हे तर रक्तपेढीचे प्राथमिक कर्तव्य असतेच, पण त्याचबरोबर वैद्यकीय क्षेत्रात अनेक वर्षे कार्यरत असूनही रक्तपेढीच्या कार्याची पुरेशी कल्पना नसणाऱ्यांना प्रशिक्षण देणे, स्वेच्छा रक्तदानाचे महत्त्वच माहीत नसणाऱ्या समाजासाठी विविध उपक्रमांद्वारे प्रबोधन करणे, रक्तदाते आणि रक्ताची गरज असणारे रुग्ण व त्यांचे आप्त यांचे समुपदेशन करणे असे व्यापक कार्य रक्तपेढी करत असते.
आपल्या बहुपेडी कामामधून जनकल्याण रक्तपेढीने जी परिसंस्था उभी केली, तिचे लोभसवाणे दर्शन महेंद्र वाघ यांनी घडवले आहे. चौफेर नजर ठेवून असणाऱया रक्तपेढी संचालकांपासून रक्तपेढीमध्ये स्वच्छतेचे, स्वयंपाकाचे करणाऱ्या प्रेमळ मावशींपर्यंत आणि स्वागत कक्षामध्ये आल्यागेल्याला कुशलतेने हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांपासून ते रुग्णालयांमध्ये रक्तपिशव्या तत्परतेने नेऊन पोचवण्याचे काम करणाऱ्या कुशल ‘रक्तदूतांपर्यंत सर्वांची इथे जिव्हाळ्याने दखल घेतली आहे. रक्तदान ही स्वेच्छेने आणि निरपेक्ष भावनेने करण्याची गोष्ट आहे’, हा संस्कार समाजामध्ये रुजवण्यामध्ये जनकल्याण रक्तपेढीचाही मोठा वाटा आहे.
व्यावसायिक गणिताच्या पुढे जाऊन एक व्रत म्हणून कार्य करण्याचा उद्देश असल्याने जनकल्याण रक्तपेढी वेगळी ठरते. रक्तपेढीची कार्यसंस्कृती, पारदर्शकता पाहून तिथल्या कार्याशी स्वतःला जोडून घेणारी माणसे ही रक्तपेढीची खरी कमाई आहे. निवृत्तीनंतर कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता तिथे येऊन काम करणारे मराठेकाका, कुलकर्णीकाका, खाडेकरकाका यांच्या कार्यमग्नतेचे एकीकडे आपल्याला प्रेरणा देते; तर दुसरीकडे शारीरिक कमरता असूनही आपल्या मर्यादेत शंभर टक्के समर्पण वृत्तीने काम करणाऱ्या राजेशची कहाणी आपल्याला चटका लावून जाते.
‘ऋणानुबंध रक्ताचे’ या पुस्तकाचा मोठा भाग जनकल्याण रक्तपेढीच्या कार्याने व्यापलेला असला असला तरीही हे केवळ त्या रक्तपेढीची गौरवगाथा सांगणारे पुस्तक नाही. सतत धावपळीच्या क्षेत्रात कार्यरत राहूनही जगाकडे डोळसपणे पाहणाऱ्या कार्यकर्त्या लेखकाने केलेल्या या नोंदी आहेत. अनेक हृद्य अनुभवांची पखरण, निवेदनाच्या ओघामध्ये सहजतेने येणाऱ्या काव्यपंक्ती, संपूर्ण निवेदनामध्ये असलेला भावनिक ओलावा यामुळे हे पुस्तक अत्यंत वाचनीय झाले आहे.
ऋणानुबंध रक्ताचे
लेखक : महेंद्र वाघ
प्रकाशक : भारतीय विचार साधना
पृष्ठ : 263, मूल्य : रुपये 250/-





























































