मृत्यू दाखल्यासाठी पैशांची मागणी करणारा कारकून निलंबित; मुंबई महानगरपालिकेची कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मृत्यू दाखला व त्याच्या प्रती देण्यासाठी पैशांची मागणी करुन ती रक्कम स्वीकारणाऱ्या आर/मध्य विभाग कार्यालयातील मृत्यू नोंदणी कारकूनास महानगरपालिका प्रशासनाने निलंबित केले आहे. शशांक राव यांनी मुंबई महानगरपालिकेच्या ट्विटर (@mybmc) या समाजमाध्यमावर तक्रार दाखल केली होती.

आर/मध्‍य विभाग अंतर्गत कार्यरत एका कर्मचाऱ्याने पैशांची मागणी करुन ते स्वीकारल्‍याबद्दल ही तक्रार होती. त्याची तातडीने दखल घेत महानगरपालिकेचे उपआयुक्‍त (सार्वजनिक आरोग्य) आणि कार्यकारी आरोग्‍य अधिकारी यांनी दिलेल्‍या दूरध्‍वनी आदेशानुसार आर/मध्य विभागाचे वैद्यकीय आरोग्‍य अधिकारी यांनी बाभई स्‍मशानभूमीमध्‍ये जाऊन तक्रारीची शहानिशा केली. त्‍यावेळी त्‍यांना या तक्रारीत तथ्‍य असल्‍याचे आढळले.

मुंबई महानगरपालिकेच्या आर/मध्य विभाग कार्यालयामध्ये मृत्‍यू नोंदणी कारकून म्हणून कार्यरत संतोष तांबे हे बाभई हिंदू स्‍मशानभूमी येथे दिनांक 17 जानेवारी 2022 रोजी रात्री 11 ते सकाळी 7 या रात्रपाळीत कार्यरत होते. त्यावेळी राजेंद्रकुमार कृष्‍णदास कि‍नारीवाला (वय 72) यांचे पार्थिव अंतिमसंस्‍कार करण्यासाठी 18 जानेवारी 2022 रोजी सकाळी 6.15 वाजता बाभई स्‍मशानभूमीत आणण्यात आले होते. अंतिम संस्‍कार झाल्यावर मृत्‍यू दाखला कुठे मिळेल, याबाबत शशांक राव यांनी कर्तव्‍यावर हजर असलेले मृत्‍यू नोंदणी कारकून संतोष तांबे यांच्‍याकडे विचारणा केली. त्‍यावेळी तांबे यांनी मृत्यू दाखला मी काढून देऊ शकतो, असे सांगत प्रत्‍येक दाखल्‍याच्‍या प्रतीसाठी 100 रुपये लागतील, असे सांगितले. राव यांनी 5 प्रती पाहिजे, असे सांगत तांबे यांना 500 रुपये दिले, अशी माहिती शहानिशा करताना निष्पन्न झाली आहे.

मृत्यू दाखल्याची पहिली प्रत विनामूल्य मिळते आणि त्यानंतर प्रत्येक छायाप्रतीसाठी 6 रुपये आकारले जातात, असे असताना मृत्‍यू नोंदणी कारकून संतोष तांबे यांनी त्‍यांचे कर्तव्‍य पार पाडताना सचोटी राखली नाही. तसेच कर्तव्‍यपरायणता ठेवली नाही. महानगरपालिका कर्मचाऱ्यास अशोभनीय ठरेल असे कृत्‍य केले. त्‍यांचे कृत्‍य हे गंभीर स्‍वरूपाच्‍या गैरवर्तणुकीचे असल्याने त्यांना प्राथमिक / खात्यांतर्गत सर्वंकष चौकशीनंतर निलंबित करण्यात आले आहे.