
सातारा तालुक्यातील निगडी येथील एका विहिरीमध्ये पडलेल्या सांबराला तब्बल आठ तासांच्या प्रयत्नांनंतर जीवदान देण्यात वन विभागाच्या पथकाला यश आले. दरम्यान, पायामध्ये शिकारीचा सापळा लागून जखमी होऊन सांबर विहिरीत पडल्याचा प्राथमिक निष्कर्ष असून, उपचार केल्यानंतर त्याची सुखरूप सुटका केल्याची माहिती सातारा तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी डॉ. निवृत्ती चव्हाण यांनी दिली.
निगडी शिवारातील एका विहिरीमध्ये सांबर पडल्याचे ग्रामस्थांना समजताच त्यांनी ही माहिती वनरक्षक राजू मोसलगी यांना शनिवारी सायंकाळी दिली. वन विभागाचे रेस्क्यू पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. तब्बल दोनशे ते सव्वादोनशे किलो वजनाचा नर जातीचा सांबर विहिरीत पडल्याचे लक्षात येताच त्यांनी स्थानिक लोकांच्या मदतीने तत्काळ मदतकार्य सुरू केले. दोरखंड व रेस्क्यू जाळीचा वापर करून मदतकार्य सुरू केले. रात्री साडेनऊ वाजता सांबराला बाहेर काढण्यात यश आले.
सांबरांच्या अंगावर ऊबदार कपडे टाकून त्याला शांत करण्यात आले. त्याची वैद्यकीय तपासणी केली असता, त्याच्या मागील उजव्या पायात शिकारीसाठी वापरण्यात येणारा सापळा अडकलेला असल्याचे निदर्शनास आले. त्याच्या पायातील सापळा त्वरित काढून टाकून जखमांवर मलमपट्टी करण्यात आली. त्याचा थकवा दूर करण्याकरिता इतर उपचार करण्यात आले. साडेबारापर्यंत सांबर बऱयापैकी सावरले. त्यानंतर त्याची सुटका करण्यात आली.
सांबराला जीवदान देण्यात वनक्षेत्रपाल डॉ. निवृत्ती चव्हाण, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. चंदन सवणे, वनपाल कुशाल पावरा, वनरक्षक राजू मोसलगी, सुहास भोसले, महेश सोनवले, श्रीकांत दुर्गे, गोरख शिरतुडे, शैलेश देशमुख, सुमित वाघ, दीपक मच्छे, तसेच निगडीचे सरपंच सुभाष श्यामराव पवार, धनंजय बबन पवार, अण्णा मारुती जाधव, सागर प्रकाश मसुगडे, तुषार विजय पवार, प्रदीप तुळशीदास जाधव, रोहित व्यंकट पवार, महेश धनाजी भोईटे, प्रीतम पवार यांनी परिश्रम घेतले. बचावकार्य सहायक वनसंरक्षक सुधीर सोनवले, उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडले.
मानवी हस्तक्षेपामुळे अस्तित्व धोक्यात
सांबर हा एक हरिण वर्गातील प्राणी असून, हा देशभरात आढळतो. या जातीचे नर प्राणी 185 ते 260 किलो वजनाचे असतात. सप्टेंबर ते जानेवारी या काळात यांचा प्रणयकाळ दिसून येतो. ‘इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचर’ या आंतरराष्ट्रीय संस्थेने या जातीचे अस्तित्व असुरक्षित असल्याचे जाहीर केले आहे. त्यामागचे प्रमुख कारण हे मानवाचा निसर्गातील वाढता हस्तक्षेप तथा शिकार आहे.



























































