मुंबईकरांचा रस्ते प्रवास होणार अधिक सुरक्षित, दुभाजकांची रंगरंगोटी, भिंतींचे सुशोभीकरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईकरांचा रस्ते प्रवास अधिक सुरक्षित व्हावा, रस्त्यांवरील दृशमानता वाढून अपघाताचे प्रमाण कमी व्हावी, यासाठी महापालिकेकडून रस्त्यांवरील दुभाजक आणि दगडांवर पिवळी-काळी रंगरंगोटी केली जात आहे. त्याचबरोबर प्रमुख रस्त्यांच्या आजूबाजूला असलेल्या भिंतीवरही कलात्मक चित्रे काढून सुशोभीकरण करण्यात येत आहे.

मुंबईत वाहनांची संख्या दरदिवशी वाढत असल्यामुळे वाहतूककोंडी होत असते. चालकांना वाहतूककोंडीबरोबर अपघाताला सामोरे जावे लागते. त्या पार्श्वभूमीवर रस्त्यांवरील दृश्यमानता वाढावी, पर्यायाने वाहनचालकांना सुरक्षित रीतीने वाहन चालवता यावे आणि अपघातांचे प्रमाण कमी व्हावे, रस्ते परिसरांचे सुशोभीकरण व्हावे, या दृष्टीने वेगवेगळ्या उपाययोजना करण्याचे निर्देश पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी दिले होते. त्यानुसार महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबालसिंह चहल, अतिरिक्त महापालिका आयुक्त पी. वेलरासू यांनी सर्व प्रशासकीय विभाग कार्यालयांना सूचना केल्या. त्यानुसार प्रमुख रस्त्यांवरील दुभाजक (डिव्हायडर) व पदपथाच्या कडेला असणाऱया दगडांची (कर्ब स्टोन) रंगरंगोटी सुरू करण्यात आली आहे.

दुभाजकांमध्ये हिरवळ, फुलझाडे बहरणार
ज्या रस्त्यांवर मध्यवर्ती दुभाजक आहेत त्यांची स्वच्छता करून नव्याने रंगरंगोटी करणे, दुभाजक अस्तित्वात नसल्यास शक्य त्या रस्त्यांवर दुभाजक बांधणे, दुभाजकांमध्ये हिरवळ आणि फुलझाडांची लागवड करणे, वाहतूक बेटांचे सुशोभीकरण करणे, प्रमुख रस्त्यांवरील आजूबाजूच्या भिंतीवर कलात्मक रंगरंगोटी करणे, चित्रे रेखाटणे आदी कामे वेगाने सुरू आहेत.