
शिवसैनिक संतोष परब हल्लाप्रकरणी भाजप आमदार नीतेश राणे यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्याची मुदत संपल्याने त्यांना आज पुन्हा कणकवली दिवाणी न्यायालयात हजर करण्यात आल्यावर त्यांना 18 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली. दरम्यान, नीतेश यांच्या छातीत दुखू लागल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
संतोष परब हल्लाप्रकरणी आमदार नीतेश राणे आणि त्यांचा स्वीय सहाय्यक राकेश परब या दोघांचीही पोलीस कोठडी आज संपत असल्याने त्यांना कणकवली येथील दिवाणी न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी झालेल्या सुनावणीदरम्यान सरकारी वकिलांनी नीतेश यांना पुण्याला नेऊन त्यांची चौकशी करायची आहे. त्यासाठी आणखी 8 दिवसांची पोलीस कोठडी आवश्यक असल्याचे सांगितले तर नीतेश राणेंचे वकील संग्राम देसाई यांनी तपासात आम्ही सहकार्य करत आहोत. आरोपीला पुण्याला घेऊन जाण्याची आवश्यकता का आहे, अशी विचारणा करत पोलीस कोठडी वाढवून देण्यास विरोध केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐवैन घेतल्यावर न्यायालयाने नीतेश राणे आणि राकेश परब या दोघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावली.
गुह्याची व्याप्ती मोठी; सरकारी वकिलांचा दावा
आमदार नीतेश राणेंना गोव्यातील हॉटेलवर नेऊन त्यांचा सीडीआर रिपोर्ट आणि नीतेश राणे, राकेश परब यांच्या तिथे झालेल्या संभाषणाची चौकशी पोलिसांनी केली. या गुह्याची व्याप्ती मोठी असल्याने आरोपीची पोलीस कोठडी आवश्यक आहे. दोन दिवसांत आरोपीकडून मोबाईल आणि सिम कार्ड जप्त केले. अजून तपास बाकी असून पोलीस कोठडी आवश्यक असल्याचा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला.
जामीन अर्जावर आज सुनावणी
कणकवली न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावताच नीतेश राणे यांच्या वकिलांनी लगेचच न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला. या अर्जावर आता उद्या म्हणजे 5 फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. मात्र, नीतेश यांच्या छातीत दुखू लागल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

































































