पँगाँगमधील चीनचा पूल बेकायदेशीरच, केंद्र सरकारची संसदेत कबुली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थान-चीनच्या सीमेवर अनेक महिन्यांपासून तणावाचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत चीनकडून पँगाँगमधील तलावावर पुलाचे बांधकाम सुरू आहे. हा पूल म्हणजे चीनचा बेकायदा कब्जा आहे. चीनकडून बेकायदेशीर भूभागात पूलाचे बांधकाम सुरू आहे, असे द्र सरकारने शुक्रवारी संसदेत मान्य केले. सरकारचे चीनच्या पूल बांधकामांवर लक्ष आहे, असेही यावेळी सांगण्यात आले.

चीनशी असलेल्या सीमावादाबाबत केंद्र सरकारने शुक्रवारी संसदेत निवेदन दिले. हिंदुस्थान आणि चीनमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचे (एलएसी) दोन्ही बाजूंकडून काटेकोर पालन केले गेले पाहिजे. एलएसीचा सन्मान राखला पाहिजे. चीनने बांधकाम सुरू केलेल्या पुलाकडे सरकारने लक्ष दिले आहे. चीनने पूर्व लडाखमधील पँगाँग तलावावर बेकायदेशीर भूभागात पुलाचे बांधकाम सुरू ठेवले आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही अपेक्षा करतो की इतर देशांनीसुद्धा हिंदुस्थानच्या सार्वभौमत्वाचा आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर करावा, असे म्हणणे सरकारने संसदेत मांडले. पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर चीनची या प्रदेशातील सैन्य ताकद वाढणार आहे. चीन सध्या या पुलाचे बांधकाम युद्धपातळीवर करीत असल्याचे उपग्रहाद्वारे घेतलेल्या छायाचित्रातून स्पष्ट झाले आहे.

सोशल मीडियावर बंधने येणार

सोशल मीडियावर अनेक वेळा द्वेषपूर्ण मजकूर प्रसारित होत असल्याने सोशल मीडियाला पायबंद घालण्याचा मनोदय आज सरकारने राज्यसभेत बोलून दाखविला. सोशल मीडियाचा अनेकदा दुरुपयोग होत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे व्यक्तीस्वातंत्र्याचे भान ठेवून सोशल मीडियावर काही बंधने येतील, असे सूतोवाच पेंद्रीय माहिती व तंत्रज्ञानमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज राज्यसभेत केले. सरकार जाणीवपूर्वक विरोधी मताचा आवाज दाबत असल्याच्या विरोधकांच्या आरोपांचाही वैष्णव यांनी इन्कार केला.