शिवमंदिरांच्या राज्यात – दहा शिवालयांचं गाव वाडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> नीती मेहेंदळे

सिंधुदुर्ग म्हणजे भरपूर देवदेवता आणि त्यांचं मूर्तरूपातलं देवत्व यथाशक्ती जपणारा जिल्हा असं म्हटलं तर देवतांमध्ये आणि भाविकांमध्ये भांडाभांडी होऊ नये, पण खरंच ग्रामदेवतेपासून शैव, वैष्णव, शाक्त, गाणपत्य आदी सगळेच संप्रदाय गुण्यागोविंदाने इथे नांदताना दिसतात.

देवगडचा किनारा आणि किल्ला पायाशी असताना उत्तराभिमुख उभं राहिलं की, पहिली दिसते ती देवगड खाडी. देवगड नदी खाडी होऊन समुद्रात विसर्जित होताना दिसते. वाडातरच्या पुलावरून खाडी ओलांडली की पहिलं लागतं ते वाडा गाव. वाडा हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं एक महत्त्वाचं गाव. इथली लहानसहान गावं कित्येक वेळा मोठ्या गावाला शरण गेल्यासारखी आपखुशीनं सामावून गेल्यासारखी वाटतात. वाड्याच्या शेजारी अशीच लहान गावं आहेत, ज्यांच्या सान्निध्यामुळे वाडा गावाचे गुणविशेष काकणभर वाढले आहेत. तिथलं नवलविशेष सांगायचं तर, खुद्द वाडा गावाच्या परिघात असलेली प्राचीन शिवालयांची भक्कम तटबंदी गावाचं धार्मिक संरक्षण करत आहे.

वाडा गाव अधिक प्रसिद्ध आहे ते विमलेश्वराच्या प्राचीन गुंफा आणि मंदिरासाठी. गावाच्या केंद्रस्थानी असलेलं हे बाराव्या शतकाआधीचं गावातलं मानाचं शिवालय. दर महाशिवरात्रीला इथे यात्रा भरते. यानिमित्ताने तिथे मोठा उत्सव असतो. या विमलेश्वराचं शिवालय डोंगरात असून त्या खरं तर गुंफा आहेत. दर्शनी भागात दरवाज्यात दोन अजस्त्र हत्तीची शिल्पं पहारेकऱ्यांसारखी नेमलेली दिसतात. अंबेजोगाईच्या लेण्यांमधले हत्ती आठवतात ते पाहून. त्यांच्यावर स्वार असलेले माहूत तर मल्ल दिसतात. मंदिरावर वरच्या बाजूला पाच मानवी मूर्ती कोरल्या आहेत, त्यांना पंचतत्त्वांचं प्रतीक मानलं जातं. प्रवेशद्वाराजवळ दहाएक दीपमाळा आहेत. मंदिर परिसरात बरेच वीरगळ मांडून ठेवलेले दिसतात. मंदिराबाहेर जवळजवळ दहाएक सारख्या उंचीच्या आणि आकारांच्या दीपमाळा आहेत. त्या मंदिराची शोभा अजून वृद्धिंगत करतात. देवळाचा गाभारा 12 फूट खोल असून आत शिवपिंडी आहे. गाभाऱ्याच्या वर छताला लाकडी तुळया लावलेल्या दिसतात. आजूबाजूला गणपती, कालभैरव आदी गुंफावजा मंदिरं दिसतात. या सगळ्या मूर्ती प्राचीन काळातल्या आहेत.

नेहमीप्रमाणे हे पांडवकालीन देऊळ असल्याची आख्यायिका याही गावात प्रचलित आहे. खुद्द मंदिर 12 व्या शतकानंतरचं साधारण शिलाहार काळातलं असावं, पण गुंफा निश्चित त्याहून आधीच्या काळात बांधलेल्या आहेत. जांभ्या दगडातले हे पूर्ण शिवमंदिर अतिशय देखणे आणि परिसरही चित्ताकर्षक आहे. विमलेश्वराच्या मंदिराला रमणीय निसर्गाची सोबत मिळालेली आहे. मंदिराशेजारी ओहळ केलेला असल्याने पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वाहत्या पाण्याचा नाद सुखावह वाटतो. नारळी-पोफळीच्या दाट राईमध्ये विसावलेलं हे शांत वातावरणात प्राचीन शिवालय आहे. याचे अधिष्ठान बऱयाच उंचीवर असल्याने काही दगडी पायऱ्याही बांधून काढलेल्या आहेत. वाड्याचं शिवप्रेम इथे संपत नाही, तर इथून सुरू होतं. विमलेश्वराला फेर धरून असावीत अशी अजून नऊ शिवमंदिरं गावाच्या पंचक्रोशीत दिसतात!

गावाच्या पश्चिम दिशेस पडवणे-फणसे गावांना सुंदर सागर सान्निध्य लाभलं आहे. या समुद्राला सन्मुख असलेलं रामेश्वर मंदिर हे या तटबंदीतलं पहिलं शिवालय. जवळ लागून असलेलं परशुराम मंदिरही तितकंच सुरेख आहे. विमलेश्वराच्या अगदीच शेजारी सप्तकोटेश्वरचंही वास्तव्य आहे. विमलेश्वराच्या वायव्येकडे वाडा वाचनालयाजवळून जाणाऱ्या मार्गाने थोडं चढणीवर बांदेश्वराचं मंदिर लागतं. ही दोन्ही शिवालये त्यामानाने जुनी नसली तरी ती शिवसाम्राज्यात भर घालत आहेत हे नक्की.

शिवाय विमलेश्वराच्या उत्तर दिशेला निकटच वाडा पोस्ट ऑफिसपाशी रवळनाथही आहे. रवळनाथ हे इथलं आणि सिंधुदुर्गात जवळपास प्रत्येक गावात मानलं जाणारं ग्रामदेवत असून इथल्या शिवमंदिरांमध्ये अजून एक घवघवीत भर घालणारं आहे. थोडं उत्तरेस सरकत जवळच्या पुरळ गावाला मार्गाने जात राहिलं की गावातलं वेशीवरचं वीरभद्रेश्वर हे आणखी एक मानाचा शिरपेच ठरेल असं देखणं शिवालय आहे. या मंदिराचा प्रकारच मुळात ऐसपैस आहे. हेही जांभ्या दगडात बांधून काढलेलं कौलारू छपराचं पुरातन मंदिर आहे. तसंच वाड्याचा दुसरा शेजारी असलेलं पडेल हे उत्तर दिशेत असलेलं विजयदुर्ग रस्त्यावरचं प्रसिद्ध गाव. या गावातलं शंकरेश्वर हे या विमलेश्वर मंदिराला समकालीन अधिकच प्राचीन मंदिर आहे. विमलेश्वरप्रमाणे शंकरेश्वर, वीरभद्रेश्वर या देवळांनाही प्रवेशद्वारासमोर भरपूर दीपमाळा आहेत. जांभ्या दगडातल्या दीपमाळांचं सौंदर्य काही औरच असतं आणि महाशिवरात्रीसारख्या सणाच्या दिवशी त्या प्रज्वलित केलेल्या पाहताना डोळय़ांचं पारणं फिटतं.

वाडा गावाच्या पूर्वेला खेटून असलेल्या वीरवाडी गावातलं महाडेश्वराचं प्राचीन शिवालय आजही सुस्थितीत आहे. ईशान्येला मांडेश्वराचं मंदिर एका उंच टेकडीवर स्थानापन्न आहे. वीरवाडीमधलं ग्रामदैवत गंगेश्वर हेही एक पुरातन शिवालयच आहे. अशा दशशिवालयग्रामी म्हणजे वाडा येथे महाशिवरात्री किंवा श्रावणी सोमवारी शिवभक्तांना काय पर्वणी असेल नाही! आणि गंमत म्हणजे, सिंधुदुर्गात अशी किती तरी शिवस्थानकं आहेत.

[email protected]