कोरोनाचा परिणाम अनेक दशके राहणार, WHO चा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगभरात कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात येऊ लागला आहे. याचदरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) या विषाणूच्या संसर्गाबाबत सावधगिरी कायम ठेवण्याचा इशारा दिला आहे. जगभर कोरोनाचा फैलाव कमी होत असला तरी या विषाणूचा परिणाम अनेक दशके राहील, असे डब्ल्यूएचओचे प्रमुख डॉ. टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस यांनी म्हटले आहे.

मागील दोन वर्षांहून अधिक काळ कोरोना महामारीने संपूर्ण जगाला वेठीला धरले आहे. विषाणूची तिसरी लाट सध्या ओसरत चालली आहे. मात्र डब्ल्यूएचओने विषाणूच्या भविष्यातील परिणामांबाबत सावध केले आहे. कोरोनाचा परिणाम असुरक्षित गटातील लोकांना (विविध व्याधी असलेले लोक) अधिक जाणवेल. महामारी जेवढी अधिक काळ राहील तितक्या अधिक प्रमाणात कोरोनाच्या परिणामांना सामोरे जावे लागेल. सध्या कॉमनवेल्थ देशांत केवळ 42 टक्के लोकसंख्येने लसीचे दोन डोस घेतले आहेत. या देशांत मोठय़ा प्रमाणात असमानता आहे. आफ्रिकन देशांनी सरासरी केवळ 23 टक्क्यांपर्यंत लसीकरण पूर्ण केले आहे. लसीकरणातील ही पोकळी भरून काढण्यास सध्या डब्ल्यूएचओचे प्राधान्य राहील, असे डॉ. घेब्रेयेसस यांनी स्पष्ट केले आहे.

युरोपात महामारी संपण्याच्या मार्गावर

युरोपात कोरोना विषाणूचा संसर्ग संपण्याच्या मार्गावर आहे. कोरोनाविरोधी लढा जिंकण्याच्या जवळपास युरोप पोहोचला आहे. येत्या काही महिन्यांतच युरोपला महामारीपासून एक ब्रेक मिळू शकतो. पुढच्या अनेक वर्षांत कोरोनाचा पुन्हा फैलाव होण्याची शक्यता खूप कमी आहे, असे डब्ल्यूएचओतील युरोप विभागाचे संचालक डॉ. हंस क्लूज यांनी जाहीर केले आहे.