सोलापूर जिल्हा परिषदेचा स्वच्छ व सुंदर शाळा उपक्रम राज्यात राबवा- उपमुख्यमंत्री अजित पवार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोलापूर जिल्हा परिषदेचा स्वच्छ व सुंदर शाळा उपक्रम राज्यात राबविण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात मंगळवारी स्वच्छ शाळा – सुंदर शाळा जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण समारंभात मार्गदर्शन करताना ऑनलाईन कार्यक्रमात ते बोलत होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, कोरोना काळात सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी चांगले काम केले आहे. माझे गाव कोरोनामुक्त गाव याबरोबरच त्यांनी स्वच्छ सुंदर शाळा उपक्रम कोरोना काळात राबवून लोकवर्गणीतून सात लाख रूपयांचे साहित्य जमा केले. यातूनच शाळा स्वच्छ व सुंदर केल्या आहेत. हा उपक्रम राज्यस्तरावर राबवण्याच्या सूचना देत पुणे विभागात सर्वप्रथम यांची अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. या उपक्रमांत सातत्य ठेवा, असे सांगत त्यांनी सोलापूर जिल्हा परिषदेचे कौतुक केले. त्यांनी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री असताना विविध उपक्रम राबविले होते. तत्कालीन उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांची आठवण होत असल्याचे सांगून त्यांनी ग्रामविकासासाठी अशा पध्दतीने विविध उपक्रम लोकसहभागातून राबविले होते.

स्वामी यांच्या पारावरची शाळा, पर्यावरण संतुलनासाठी माझी वसुंधरा उपक्रम, माझे मुल माझे अभियान, माझे गाव कोरोनामुक्त गाव उपक्रमाची दखल राज्य स्तरावर घेऊन त्याचा शासन निर्णय काढण्यात आला. अशा उपक्रमाची आज आवश्यकता असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

मी शाळा पाहणार – अजित पवार
ऑनलाईन कार्यक्रमाने पुरस्कार वितरण करण्यात आले असले तरी ज्या 2764 शाळेमध्ये स्वच्छतेचे काम केले आहे, ते काम महत्वपूर्ण आहे. सात कोटी रूपये जमा करणे येड्यागबाळ्याचे काम नाही, खरी मेहनत घेतली आहे. ज्यावेळेस सोलापूर जिल्ह्यात जाईन त्याचवेळी शाळा पाहून तेथील शिक्षकांचा गौरव, करेन असेही पवार म्हणाले. पालकमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, सोलापूर जिल्हा परिषदेने विविध अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्याची मान राज्यात उंचावली आहे. माळशिरस तालुक्यांतील कारूंडे शाळेचा गौरव करून एका दिवसात 41 लाख रूपये ग्रामस्थांनी जमा करून या अभियानाचे महत्व अधोरेखीत केले. मुंबई येथे पाच शाळांचे मुख्याध्यापक यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते गौरव करण्यात आला तर जिल्हास्तरावर 39 शाळांचा गौरव करण्यात आला.