हिंगणघाट प्रकरणी आरोपी विक्की नगराळे दोषी, गुरुवारी निकाल जाहीर होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंगणघाट येथील जळीतकांड प्रकरणी वर्धा येथील न्यायालयाने आरोपी विक्की नगराळे याच्यावर हत्येचा ठपका ठेवत त्याला दोषी ठरवलं आहे. या प्रकरणी गुरुवारी त्याच्या शिक्षेची सुनावणी केली जाणार आहे.

दोन वर्षांपूर्वी वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे प्राध्यापक तरुणीला एकतर्फी प्रेमातून जिवंत जाळण्यात आलं होतं. 3 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी सवा सातच्या सुमाराला हिंगणघाट येथील नंदोरी मार्गावर पीडितेच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला जिवंत जाळण्यात आलं होतं. या घटनेत 40 टक्के भाजल्याने गंभीर जखमी झालेल्या पीडितेचा 10 फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला होता.

या घटनेत विकी नगराळे हे नाव आरोपी म्हणून पुढे आलं होतं. पोलिसांनी या घटनेनंतर त्याला अटक केली होती. दारोडा येथील रहिवासी असलेला विकी हा विवाहित आहे. घटना घडण्याच्या दोन ते तीन वर्षं आधीपासून पीडितेवर त्याचं एकतर्फी प्रेम होतं.

या करणाच्या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली होती. आरोपी विकेश नगराळेविरोधात तब्बल 426 पानांचे आरोपपत्र हिंगणघाटच्या प्रथम श्रेणी न्यायालयात दाखल केले होते. या प्रकरणात आतापर्यंत 29 साक्षीदारांची तपासणी करण्यात आली आहे. या प्रकरणी दोन्ही बाजूचा युक्तिवाद संपला असून गुरुवारी याचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.