उकळते पाणी अंगावर ओतून केली होती हत्या, तुळसणी येथील खून खटल्यातील 9 जण निर्दोष

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संगमेश्वर तालुक्यातील तुळसणी येथील गाजलेलं राजू मुकादम खून प्रकरणाचा निकाल न्यायालयाने दिला. राजू मुकादम याच्या अंगावर गरम पाणी ओतून हत्या केल्याच्या आरोपातून 9 जणांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या जबाबातील विसंगती आणि संबंधित महिलेने अतिप्रसंगातून वाचण्यासाठी किंवा स्वसंरक्षणासाठी मुकादमच्या अंगावर पाणी ओतले, असा निष्कर्ष नोंदवून न्यायालयाने हा निकाल दिला.

सादीक हुसेन कापडी, मकसूद मुकादम, तन्वीर मुकादम, मुआज्जम रज्जाक मुकादम, जलाल बोट, आसरीन मुकादम, फियदोस कापडी, संदीप पवार, विकास पवार, अशी निर्दोष सुटलेल्या नऊ जणांची नावे आहेत. ही घटना 27 मार्च 2018 ला घडली होती. अनैतिक संबंधाच्या संशयातून राजू मुकादम यांचा खून करण्यात आला, असा आरोप नऊ जणांवर ठेवण्यात आला होता.

27 मार्चला राजू मुकादम दुचाकीवरून तुळसणी ते कातकरीवाडी रस्त्याने मुस्लिम मोहल्ला येथे घरी जात होता. या संधीचा फायदा घेऊन संशयितानी दुचाकी अडवून त्याच्या तोंडावर रुमाल बांधून संशयितांपैकी एकाच्या घरात घेऊन गेले होते. त्या ठिकाणी राजूचे हातपाय बांधून त्याला लाथा बुक्यानी मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या अंगावर गरम पाणी ओतून त्याला गंभीर जखमी करण्यात आले. त्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला, अशी तक्रार दाखल करण्यात आली होती. या खटल्यात दोन्ही बाजूचा युक्तीवाद पूर्ण झाला. खटल्यात चार वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्षही नोंदवण्यात आली होती.

अंतिम निर्णय देताना न्यायालयाने प्रत्यक्षदर्शींच्या जबाबातील विसंगती, अतिप्रसंगातून वाचण्यासाठी या प्रकरणातील महिलेने स्वसंरक्षणार्थ अंगावर पाणी ओतल्याचा प्रयत्न योग्य वाटतो, असा निष्कर्ष नोंदवला. त्यामुळे खटल्यातील नऊ आरोपीची हत्येच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली. आरोपीं पक्षातर्फे अॅड. एन. जी. गवाणकर, अॅड. प्रदीप नेने, अॅड. प्रफुल्ल दामले, अॅड. क्षितिज दामले, अॅड. मधूरा आठल्ये, अॅड. शरद मुळ्ये, अॅड. प्रवीण सुर्वे, ऍड. व्ही. एस. गर्दे, अॅड. महेंद्र मांडवकर यांच्यासह अॅड. श्रुती कांबळे, अॅड. चिन्मय बोरकर, अॅड. विश्वनाथ दापके यांनी काम पाहिले.

या खटल्यात बचाव पक्षाकडून राजू मुकादम याचा मृत्यूपूर्व जबाब, वैद्यकीय साक्षीपुरावा, तसेच साक्षीदारांचा जबाब यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. संशयित आरोपी यांचा राजूला मारण्याचा हेतू नव्हता. त्यामुळे खूनाचे कलम हटविण्यात यावे, अशी मागणी बचाव पक्षाकडून करण्यात आली होती. तसेच आसरीन मुकादम हिने स्वत:च्या बचावासाठी गरम पाणी राजू याच्या अंगावर उडविले, असा बचाव केला होता. सरकारी पक्षाकडूनही जोरदार युक्तीवाद करण्यात आला. दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने या खटल्यातील नऊ आरोपिंची निर्दोष मुक्तता केली.