अंधेरीतील संगीतकार अनिल मोहिले उद्यानाला नवा संगीतमय साज; विविध वाद्यांच्या आकर्षक प्रतिकृती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई महापालिकेने अंधेरीतील संगीतकार अनिल मोहिले मनोरंजन उद्यानातील वाद्यांच्या आकर्षक प्रतिकृतींची डागडुजी, रंगरंगोटी करून उद्यानाला एक नवा संगीतमय साज चढवला आहे. पुष्पवाटिका, योग केंद्र, खुल्या व्यायामशाळेसह मुलांसाठी खेळणी आणि ध्वनिक्षेपकांमधून मृदू संगीत ऐकण्याची व्यवस्थाही केली आहे.

मुंबई महापालिका उद्यानांमध्ये फिरायला, योग आणि व्यायाम करायला येताना डोळ्यांना, मनाला एक सुखद आनंद मिळावा, यासाठी महापालिकेचा उद्यान विभाग विविध संकल्पना राबवत असतो. महापालिकेने अंधेरी (पश्चिम) येथील चार बंगलानजीक व मॉडेल टाऊन परिसरात तयार केलेल्या संगीतकार अनिल मोहिले उद्यानाचे उद्घाटन काही वर्षांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले होते. ‘संगीत’ या संकल्पनेवर आधारित हे ‘थीम’ उद्यान संगीतकार स्व. अनिल मोहिले यांच्या स्मृतींना समर्पित आहे. अनिल मोहिले हे याच उद्यानाच्या परिसरात दरवर्षी ‘दिवाळी पहाट’ या कार्यक्रमाचे आयोजन करत असत. हे उद्यान दररोज सकाळी 6 ते दुपारी 12 आणि दुपारी 3 ते रात्री 9पर्यंत खुले असते. नव्याने नूतनीकरण केलेल्या कामाच्या उद्घाटना वेळी अतिरिक्त पालिका आयुक्त अश्विनी भिडे, ‘के-पश्चिम’चे सहाय्यक आयुक्त डॉ. पृथ्वीराज चौहान, उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी आदी उपस्थित होते.

  • हे उद्यान 1 लाख 1 हजारांपेक्षा अधिक चौरस फुटांच्या विस्तीर्ण परिसरात बहरलेले उद्यान आहे.
  • उद्यानात तबला, संवादिनी (हार्मोनियम), वीणा, सितार, गिटार इत्यादी वाद्यांच्या प्रतिकृती आहेत. या प्रतिकृतींसोबत सेल्फी, छायाचित्रे काढण्यासाठी रहिवाशी आणि मुलांची गर्दी होते. 
  • उद्यानाच्या प्रवेशद्वाराजवळ भिंतीवरदेखील की–बोर्ड, मृदुंग, तबला–डग्गा व संगीत चिन्हांचा वापर करून आकर्षक रंगरंगोटी केली आहे. 
  • पुष्पवाटिका, पुष्पकुंजसह फुले असणाऱया वेलींचा ‘पुष्पलता मंडप’देखील आहे. विविध झाडे, फुलझाडे आणि आकर्षक हिरवळदेखील आहे. 
  • खुली व्यायामशाळा, योग केंद्र, व्हॉलीबॉल मैदान, आसन व्यवस्थेसह 3 ‘गझिबो’देखील आहेत.