
कॉर्डेलिया क्रूझवरील ड्रग्ज पार्टी धाडीदरम्यान खंडणीचा आरोप असल्याप्रकरणी एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांची आज एनसीबीसीच्या दक्षता पथकाकडून चौकशी करण्यात आली. एनसीबीच्या दक्षता पथकाने तीन अधिकाऱयांना चौकशीसाठी बोलावले होते. यामध्ये समीर वानखेडे यांचाही समावेश होता.
कॉर्डेलिया क्रूझवरील धाडीवेळी शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान यालाही अटक करण्यात आली होती. या धाडीतील एकमेव साक्षीदार असलेल्या प्रभाकर साईल याने या धाडीदरम्यान एनसीबी अधिकाऱयांनी 25 कोटींच्या खंडणीची मागणी केल्याचा आरोप केला होता. वानखेडे आणि त्यांच्या पथकातील अधिकाऱयांची याआधी दक्षता पथकाकडून चौकशी करण्यात आली होती. वानखेडे यांनी आज झालेल्या चौकशीदरम्यान आपले म्हणणे मांडले असून यासंदर्भातील कागदपत्रेही एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंग यांना सादर केली असल्याचे सूत्रांकडून समजते. याविषयीचा अहवाल आता एनसीबीच्या महासंचालकांना सादर केला जाणार आहे. दक्षता पथकाने 11 फेब्रुवारी रोजी एनसीबीचे अधिकारी आशीष रंजन यांची तर 12 फेब्रुवारी रोजी व्ही. व्ही. सिंग यांची चौकशी केली आहे.
























































