उसाच्या ट्रॉलीला कारची धडक; श्रीगोंदा तालुक्यातील भीषण घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मित्राला घरी सोडण्यासाठी जाणाऱ्या तीन मित्रांवर काळाने घाला घातल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी शिवारात घडली आहे. रविवारी मध्यरात्री एक वाजता उसाच्या ट्रॉलीला कार धडकल्याने हा अपघात झाला आहे. एकाच वेळी तीन मित्रांनी प्राण गमावल्याच्या घटनेने श्रीगोंदा तालुक्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

राहुल सुरेश आळेकर (वय 22, रा. श्रीगोंदा), केशव सायकर (वय 22, रा. काष्टी) व आकाश रावसाहेब खेतमाळीस (वय 18, रा. श्रीगोंदा) अशी मृतांची नावे आहेत. आकाश व राहुल हे केशवला घरी सोडण्यासाठी जात होते.

राहुल, केशव आणि आकाश हे तिघे एकमेकांचे मित्र असून, त्यांच्यापैकी एकाचा काही दिवसांपूर्वी वाढदिवस होता. वाढदिवसाच्या जेवणाची पार्टी केल्यानंतर आकाश व राहुल हे केशवला घरी सोडण्यासाठी काष्टीला जात होते. दरम्यान, गाळप हंगाम सुरू असल्यामुळे श्रीगोंदा तालुक्यामध्ये सध्या दिवस-रात्र उसाची वाहतूक सुरू आहे. श्रीगोंदा-काष्टी महामार्गावर रात्रीच्या वेळी हॉटेल अनन्याजवळ ऊस भरलेला ट्रॅक्टर रॉड तुटल्याने ट्रॉलीसह रस्त्याच्या मध्येच उभा करण्यात आला होता. या ट्रॉलीच्या मागे रिफ्लेक्टर लावलेला नसल्यामुळे या तरुणांची गाडी ट्रॉलीला धडकली. अपघात इतका भीषण होता की, कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन जाताना तिसऱ््याचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच, श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुनील सूर्यवंशी हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले.

अपघातग्रस्त कार ट्रॉलीच्या खाली निम्म्यापर्यंत आत गेली होती. त्यामुळे कटरच्या साहाय्याने पत्रा कापून गाडीतील मृतदेह बाहेर काढण्यात आले. अपघातानंतर ट्रॅक्टरचा चालक फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. याप्रकरणी साहेबराव आळेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

नातवाच्या मृत्यूचा धक्का बसून आजोबांचे निधन

राहुल आळेकर या युवकाचे रात्री अपघाती निधन झाले. त्याच्या निधनाची बातमी समजल्यानंतर त्याचे आजोबा जालिंदर लहानू शिंदे (वय 63, रा. घारगाव, ता. श्रीगोंदा) हे आज सकाळी अंत्यविधीसाठी आले होते. नातवाच्या निधनाचा धक्का सहन न झाल्यामुळे त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्यांना शहरातील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले; परंतु त्यांचाही मृत्यू झाला.

ऊसवाहतुकीचे ट्रॅक्टर बनले मृत्यूचे सापळे

सध्या श्रीगोंदा तालुक्यातील चारही कारखान्यांचा ऊसगळीत हंगाम जोरात सुरू आहे. आरटीओ परवानगी नसतानाही ऊसवाहतूकदार एका ट्रॅक्टरला दोन-दोन ट्रॉल्या जोडून उसाची वाहतूक करत आहेत. चालक टेपरेकॉर्डरचा मोठा आवाज करून ट्रॅक्टर चालवतात. ट्रॉलीला पाठीमागून रिफ्लेक्टर लावले जात नाहीत. त्यामुळे रात्रीच्या वेळी पाठीमागून आलेल्या वाहनाला अंदाज येत नाही. परिणामी सतत अपघात होऊन सामान्य नागरिकांचा बळी जात आहे.