युद्ध रशियाचे… हिंदुस्थानच्या अर्थव्यवस्थेवर बॉम्बहल्ला! शेअर बाजारात हडकंप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रशियन फौजा कोणत्याही क्षणी युक्रेनवर हल्ला करतील अशी तणावाची स्थिती निर्माण झाल्यामुळे जगभरात याचे पडसाद उमटत आहेत. हिंदुस्थानच्या अर्थव्यवस्थेवर तर ‘बॉम्बहल्ला’ होण्यास सुरुवात झाली आहे. सोमवारी मुंबई शेअर बाजारात अक्षरशः हडकंप झाला. सेन्सेक्स 1747 अंकांनी कोसळला. दोन दिवसांत गुंतवणूकदारांचे तब्बल 12.38 लाख कोटी रुपये बुडाले. दरम्यान, महागाईचा आणखी भडका उडाला आहे. किरकोळ महागाईचा दर 6.01 टक्क्यांवर गेला असून सात महिन्यांतील हा उच्चांक आहे.

रशिया-युक्रेन युद्ध टळावे यासाठी अमेरिकेसह नाटो देशांचे प्रयत्न सुरू असले तरी पेच सुटलेला नाही. बीजिंग ऑलिम्पिक संपण्यापूर्वी म्हणजे 20 जानेवारीपूर्वीच रशियाकडून युक्रेनवर हल्ला होईल. येत्या दोन-चार दिवसांतच रशियन फौजा युक्रेनमध्ये घुसतील अशी दाट शक्यता आहे. या युद्धामुळे रशिया आणि अमेरिकेचे संबंध कमालीचे ताणले गेले आहेत.  त्याचबरोबर जगभरातील अर्थव्यवस्थेवरही याचे पडसाद उमटत असून कच्चे तेल 100 डॉलर्स प्रतिबॅरलवर गेल्यामुळे पेट्रोल दरवाढ अटळ आहे.

खाणे, फिरणे सगळेच महागले

महागाईनेही सात महिन्यांचा उच्चांक गाठला आहे. कन्झुमर प्राईज इंडेक्स अर्थात ग्राहक मूल्य निर्देशांकानुसार जानेवारीत किरकोळ महागाईचा दर 6.01 टक्क्यांवर गेला असून सात महिन्यांतील हा उच्चांक आहे. जानेवारी 2021 मध्ये किरकोळ महागाई 4.06 टक्क्यांवर होती. त्यात तब्बल 2 टक्के वाढ झाली आहे. धान्य, खाद्यपदार्थांचा महागाईचा दर 4 टक्क्यांवरून 5.43 टक्क्यांवर गेला आहे. भाज्यांचे दर 5.19 टक्क्यांनी भडकले.

सेन्सेक्स 1747 अंकांनी कोसळला

गेल्या आठवडय़ाच्या शेवटच्या सत्रात शुक्रवारी सुरू झालेली पडझड सोमवारीही पाहायला मिळाली. सेन्सेक्स तब्बल 1747 अंकांनी कोसळून 56,296 अंकांवर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा अर्थात निफ्टीचा निर्देशांक 532ने खाली आला. बाजार बंद होताना निफ्टीचा अंक 16843 वर स्थिरावला होता.

रशिया-युक्रेनमधील तणावामुळे शेअर बाजारात पडझड सुरू असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. शुक्रवारी आणि सोमवारी या दोन सत्रांत गुंतवणूकदारांचे 12.38 लाख कोटी बुडाले.