प्रसूतीनंतर येणारे स्ट्रेच मार्क घालवण्यासाठी ‘हे’ करा सोपे घरगुती उपाय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महिलांमध्ये प्रसुतीनंतर पोटावर येणारे स्ट्रेच मार्क ही एक सर्वसाधारण समस्या आहे. पाठ, पोट, कंबर, छाती यावर येणारे स्ट्रेचमार्क स्त्रीचा लूक बिघडवतात. या खुणा घालवण्याकरिता आणि लपवण्याकरिता तऱ्हतऱ्हेचे उपाय केले जातात. याकरिता अनेक महागड्या क्रिम वापरल्या जातात, मात्र यावर काही सोपे घरगुती उपायही परिणामकारक ठरू शकतात. दररोज म्हणजे साधारण महिना-दोन महिनाभर हे उपाय केल्याने स्ट्रेच मार्क हळूहळू विरळ होऊन कायमचे निघून जाण्यासाठी नक्कीच मदत होऊ शकते. शिवाय याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत.

घरगुती स्क्रब
मृत त्वचा आणि स्ट्रेच मार्क कमी करण्यासाठी स्क्रब अत्यंत उपयुक्त आहे. याकरिता होममेड म्हणजे घरी स्क्रब तयार करून त्याचा वापर करू शकता. यासाठी1 चमचा बदाम पावडर, 1 चमचा कॉफी आणि साखर हे पदार्थ व्यवस्थित मिसळा. त्यानंतर त्याची पेस्ट तयार करा. पेस्ट करण्यासाठी यामध्ये अर्धा चमचा नारळाचे तेल घाला. दररोज हे स्क्रब पोटाला लावून मसाज करा. स्ट्रेच मार्क कमी करण्याचा हा प्रभावी उपाय आहे.

लिंबू साल पावडर (लेमन पील पावडर)
स्त्रियांच्या सौंदर्य प्रसाधनांमधील लिंबाच्या सालीची पावडर हा एक मुख्य पदार्थ असू शकतो. दररोज अंघोळीपूर्वी स्क्रब करण्यासाठी लिंबाच्या सालीची पावडर वापरू शकता. 1 चमचा लिंबू पावडर घ्या. यामध्ये मध मिसळा. आता हे मिश्रण पोट आणि स्ट्रेच मार्क असलेल्या त्वचेवर इतर ठिकाणी जोडा. त्वचा कोरडी असल्यास यामध्ये खोबरेल तेल घाला. महिनाभर हा उपाय केल्यास फरक दिसून येईल.

बटाट्याचा रस
त्वचेचा रंग उजळण्यासाठी बहुतांश वेळा बटाट्याचा रस वापरला जातो. यामध्ये असलेले ब्लिचिंग एजंट त्वचेला घट्ट ठेवण्यासाठी तसेच त्वचेचा ग्लो सुधारण्यासाठी मदत करतात. स्ट्रेच मार्क कमी करण्यासाठी 1 चमचा बटाट्याच्या रसामध्ये 1 चमचा कोरफडीचा गर मिसळा. त्यानंतर स्ट्रेच मार्क असलेल्या भागावर दररोज ही पेस्ट लावा. बटाट्याच्या रसाऐवजी बेटाट्याच्या पेस्टमध्ये कोरफडीचा गर मिसळूनही लावू शकता.

एरंडेल तेल
मसाजाकरिता एरंडेल तेल अतिशय गुणकारी मानले जाते. याऐवजी ऑलिव्ह ऑईलचाही वापर करू शकता. रात्री झोपण्यापूर्वी एरंडेल तेल कोमट करून पोटाला लावून मसाज करा. दररोज तेल लावून मसाज केल्याने डाग निघून जातील आणि त्वचाही उजळेल. रात्रीऐवजी सकाळी अंघोळ केल्यानंतर एरंडेल किंवा आलिव्ह तेलाने मसाज करू शकता. महिनाभरात हा उपाय केल्याने फायदा होऊ शकतो.

रोटिनॉलयुक्त क्रीमचा वापर
स्ट्रेच मार्क्स काढण्यासाठी जेवणाचीही विशेष काळजी घ्यायला हवी. यासाठी व्हिटॅमिन सी युक्त फळे खा. तसेच भरपूर पाणी प्या. त्याचबरोबर बाजारात मिळणारी रेटिनॉल युक्त क्रीम्स स्ट्रेच मार्क्स काढण्यासाठी लावू शकता. रेटिनॉल जीवनसत्त्व ए मध्ये आढळते. यामुळे कोलेजन तयार करण्यास मदत होते. याशिवाय चीज, अंडी, माशाचे तेल, दूध आणि दही या पदार्थांचाही आहारात समावेश करावा. रेटिनॉलचे हे मुख्य स्त्रोत आहेत.