
मुंबईत कोरोनाची तिसरी लाट आता पूर्ण नियंत्रणात आली असून सलग तिसऱया दिवशी एकही मृत्यू झालेला नाही. तर दिवसभरात तब्बल 34 हजार 863 चाचण्या केल्या असताना केवळ 259 कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यामुळे मुंबईसाठी समाधानकारक चित्र निर्माण झाले आहे.
मुंबईत डिसेंबरअखेर सुरू झालेल्या कोरोना लाटेत जानेवारीच्या पहिल्याच आठवडय़ात दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येने 20 हजारांचा टप्पा गाठल्याने मुंबईचे टेन्शन वाढले होते. मात्र एका महिन्यातच कोरोनाची तिसरी लाट पूर्ण नियंत्रणात आली आहे. विशेष म्हणजे 24 तासांत 30 हजारांवर चाचण्या होत असताना सुमारे 200 ते 250 रुग्ण आढळत आहेत. यातील 95 टक्क्यांहून जास्त रुग्णांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नसल्याने कोरोनाची तिसरी लाट पूर्ण ओसरत असल्याचे समाधानकारक चित्र निर्माण झाले आहे. मुंबईत 2 जानेवारीनंतर मंगळवारी पहिल्यांदाच शून्य मृत्यूची नोंद झाली होती. तर मुंबईत मार्च 2020 मध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर डिसेंबर 2021 मध्ये सात वेळा शून्य मृत्यू नोंदवला गेला होता. मुंबईत कोरोना नियंत्रणात आला असला तरी मुंबईकरांना अजूनही कोरोना खबरदारी घेण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.
रुग्ण दुपटीचा कालावधी अडीच हजार दिवसांवर
मुंबईत दैनंदिन रुग्णसंख्या घटल्याने रुग्ण दुपटीचा कालावधी 2407 दिवसांवर गेला आहे. तर रुग्ण बरे होण्याचा दर 98 टक्क्यांवर आणि रुग्णवाढीचा दर 0.03 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.
दरम्यान, मुंबईत आढळलेल्या नव्या रुग्णांमधील 20 जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. यातील सात जणांना ऑक्सिजनची गरज लागली. तर एकाच दिवसात 426 जणांनी कोरोनावर मात केल्याने मुंबईत आता 1 हजार 945 सक्रिय रुग्ण आहेत.
























































