
>> स्पायडरमॅन
आपण अनेक धार्मिक स्थळांना भेटी देतो, उद्यानांना भेटी देतो, दिवसभरात अनेकदा ट्रफिक सिग्नलला थांबतो. या सर्व ठिकाणी एकाच गोष्टीला आपण भयानक वैतागतो आणि ते म्हणजे हात पसरणारे भिकारी. ‘यत्र तत्र सर्वत्र’ असणारे हे भिकारी आपला पिच्छा काही सोडता सोडत नाहीत. मग आपण आपले नेहमीचे पालुपद बाहेर काढतो, ‘सुट्टे नाहीत बाबा’ किंवा ‘छुट्टा नही है.. आगे जाओ’. मात्र आता या आधुनिक तंत्रज्ञानाने व्यापलेल्या जगात हे पालुपददेखील तुमच्या मदतीला येण्याची शक्यता बंद होणार आहे. कारण आता भिकारी ‘डिजिटल’ व्हायला लागले आहेत. ‘सुट्टे नाहीत; तर मग गुगल पे किंवा फोन पे करा साहेब’ या वाक्याची आता तुम्ही सवय करून घ्यायला हरकत नाही.
सध्या राजू पटेल हा बिहारमधील बेतियातला भिकारी प्रचंड चर्चेत आहे. लोक त्याला देशातला पहिला ‘डिजिटल भिकारी’ म्हणून संबोधत आहेत. राजू पटेल चक्क सुट्टे पैसे नसल्यास ‘ऑनलाईन भीक’देखील स्वीकारतो. लोक राजू पटेलला ‘गुगल पे’, ‘फोन पे’ अथवा इतर विविध डिजिटल पेमेंटच्या माध्यमातूनदेखील भीक प्रदान करू शकतात. राजू पटेल हा भिकारी चक्क गळ्यात `QR Code’ चा बोर्ड बांधून भीक मागत असतो. एवढेच नाही, तर चक्क त्याच्या हातात तुम्हाला टॅबदेखील दिसेल. राजू पटेल हा म्हणे लहानपणापासून भीक मागूनच जगत आला आहे. रेल्वे स्टेशनवर कायमस्वरूपी भीक मागणाऱया राजूला गेल्या काही काळापासून सतत ‘सुट्टे पैसे नाहीत’ किंवा ‘आजकाल खिशात कॅश कोण ठेवते?’ अशा शब्दांना सामोरे जावे लागत होते. शेवटी हुशार राजूने शक्कल लढवली आणि स्वतःला ‘डिजिटल भिकारी’ बनवले.
राजूने सगळ्यात आधी स्वतःचे पॅन कार्ड बनवले आणि त्याच्या मदतीने बँकेत स्वतःचे एक खाते उघडले. एकदा बँकेत खाते उघडले गेल्यावर राजूने ताबडतोब ‘गुगल पे’ आणि ‘फोन पे’चा आसरा घेतला आणि ‘ऑनलाईन भीक’ स्वीकारायला सुरुवात केली. सध्या राजू देशभरात चर्चेचा विषय बनलेला आहे.
























































