दखल : अभंगवृत्तातील ‘मेघदूत’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>सुधाकर वसईकर

पत्नीवियोगात व्याकूळ, शोकमग्न अवस्थेतील शापित यक्षाचे कालिदासाने इ.स.4 ते इ. स.6 व्या शतकाच्या कालखंडात लिहिलेलं ‘मेघदूत’ हे अजरामर खंडकाव्य.

डॉ. वसुधा वैद्य यांनी प्रियेच्या विरहात व्याकूळ झालेल्या प्रियकराचे, तिच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पतीचे निस्सीम प्रेम, सर्वांना अर्थबोध होईल अशा अभंगवृत्तातून ‘मेघदूत’ हे खंडकाव्य ‘महाकवी श्रीकालिदास रचित मेघदूत’ याद्वारे अनुवादित करून कालिदासाचे संस्कृत श्लोक, अभंग आणि त्याचा स्वैर भावानुवाद केला आहे.

मूळ ‘मेघदूत’मधील सारी गुण-वैशिष्टय़ अबाधित ठेवत साध्या, सोप्या आणि तरल भाषेत आजच्या वाचकांना डॉ. वसुधा वैद्य यांनी ही अनोखी अशी भेट दिली आहे. हा संग्रह वाचताना मराठी भाषेचे सौंदर्य आणि सौष्ठव काय आहे याची प्रचीती येते. आपणच आपल्या भाषेला किती रुक्ष केली आहे, किती गढूळ केले आहे याची जाणीव भाषाप्रेमी सजग मनाला झाल्याशिवाय राहत नाही. उदा. मेघास उद्देशून येणारे घना, जलदा, पयोधरा, नीरदा, नीरवंता, वारिदा अंबुद, जलधरा, वारिधर ही विविध नावे वाचल्यावर अचंबित व्हायला होते. कवयित्रीने निसर्गाला नवीन शब्दांची जोड देऊन काव्य अर्थवाही केले आहे. एकाच शब्दाच्या अनेक छटा दर्शवणारे शब्द योजून भाषासौंदर्यात भरच घातली आहे. प्रवास मार्गातील भौगोलिक प्रदेश, नद्या, नगरे, पठारे, पक्षी यांचे मनोहारी, अनुपम असे वर्णन अभंगरचनेच्या स्वैर अनुवादात वाचणे म्हणजे निर्सगाची नित्यनवीन अनुभूतीच!

आजवर विविध भाषांत मेघदूत खंडकाव्याचे भाषांतर झाले असून जागतिक पातळीवरदेखील भाषांतरे झाली आहेत. अनेक साहित्यिकांना आजही मेघदूत भुरळ घालतेय.मूळ खंडकाव्यातील 120 श्लोकांचे पूर्वमेघ 66 आणि उत्तरमेघ 55 अभंगरचनेतून केलेल्या स्वैर अनुवादाचे महत्कार्य डॉ. वसुधा वैद्य यांनी इतके लीलया पेलले आहे की, सहज एक-एक अभंग वाचून त्याचा उत्कट रसास्वाद घेता येतो. ग्रंथाला वासुदेव कामत यांचे सुबक आणि सूचक मुखपृष्ठ लाभले

महाकवी श्री कालिदास रचित ‘मेघदूत’
कवयित्री : डॉ. वसुधा वैद्य
प्रकाशन : विजय प्रकाशन
पृष्ठे 138, मूल्य : रुपये 200/-