तीन मराठी सिनेमांची टक्कर, ‘चाबूक’, ‘पाँडीचेरी’ आणि ‘लकडाऊन’ या आठवड्यात होणार प्रदर्शित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एकाच आठवड्यात एकाहून अधिक मराठी चित्रपट प्रदर्शित होणे ही बाब आता काही नवीन राहिलेली नाही. या  आठवड्यात ‘चाबूक’, ‘पाँडीचेरी ’ आणि ‘लकडाऊन बी पॉझिटिव्ह’ असे तीन मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. दमदार आशय आणि तगड्या स्टारकास्टमुळे या आठवड्यात मराठी प्रेक्षकांना मनोरंजनाची पर्वणीच ठरणार आहे.

‘चाबूक’ या चित्रपटात आजच्या युगात माणसांचा माणसाशी संवाद कमी होत चालला आहे. त्यावर वेळीच अनुभव आणि निरीक्षणाच्या मदतीने आत्मपरीक्षणाचा ‘चाबूक’ ओढण्याची गरज असल्याचे दाखवून देणारा हा चित्रपट एका कुटुंबाची कथा आपल्यासमोर मांडतो. कल्पेश भांडारकर दिग्दर्शित या चित्रपटात समीर धर्माधिकारी,स्मिता शेवाळे,सुधीर गाडगीळ आणि मिलिंद शिंदे अशी तगडी स्टारकास्ट आहे.

संतोष मांजरेकर दिग्दर्शित ‘लकडाऊन बी पॉझिटिव्ह’मध्ये अंकुश चौधरी आणि प्राजक्ता माळी ही फ्रेश जोडी झळकणार आहे. लॉकडाऊनमध्ये एका लग्नघरात नेमके काय काय घडले असेल याचे चित्रण यात आहे. या चित्रपटात 15 नावाजलेले चेहरे दिसणार आहेत. तर ‘पाँडीचेरी’ हा स्मार्टफोनवर शूटिंग करून प्रदर्शित होणारा पहिलाच चित्रपट आहे.सचिन कुंडलकर दिग्दर्शित या चित्रपटात सई ताम्हणकर, वैभव तत्ववादी, अमृता खानविलकर मुख्य भूमिकेत आहेत.

‘पावनखिंड’ हाऊसफुल्ल
‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषात महाराष्ट्राच्या कानाकोपऱयातील सिनेमागृहांमध्ये ‘पावनखिंड’च्या शोला प्रेक्षकांनी तुफान गर्दी केली आहे. या चित्रपटाच्या नावावर एक अनोखा विक्रम नोंदविला गेला आहे. पहिल्याच दिवशी 1530 शोजसह ‘पावनखिंड’ चित्रपटगृहात दाखल झाला, तर शनिवारी 421 चित्रपटगृहांमध्ये 1910 शोज एवढ्या विक्रमी संख्येने ‘पावनखिंडची जोरदार घौडदौड सुरू आहे.दिग्पाल लांजेकरच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या ‘पावनखिंड’ या चित्रपटात वीर बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेनेच्या पराक्रमाची यशोगाथा पाहायला मिळत आहे.