
‘हृदयाचे ठोके वाढले आहेत… काळजी वाटतेय… आशा करतो की सर्वकाही ठीक असेल,’ अशा आशयाचे ट्विट रविवारी रात्री महानायक अमिताभ बच्चन यांनी केल्यामुळे त्यांच्या चाहत्यांची धडधड वाढली. अनेकांनी त्यांच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त करत लवकरच बरे होण्याची प्रार्थना केली. अखेर बिग बी यांचा ब्लॉग पाहून चाहत्यांची चिंता मिटली आहे.
बिग बी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. दैनंदिन जीवनातील घडामोडी, जुन्या आठवणी ते चाहत्यांसोबत शेअर करतात. नुकतेच बिग बी यांनी ‘हृदयाचे ठोके वाढले आहेत…’ अशा आशयाचे ट्विट केल्यामुळे चाहते काळजीत पडले होते. या ट्विटनंतर बिग बी यांनी ब्लॉग पोस्ट लिहिली आहे. त्यात त्यांनी म्हटलंय, ‘मढमध्ये माझ्या आगामी प्रोजेक्टचे शूटिंग सुरू आहे. दिवसभर कामात व्यस्त होतो, शूटिंगमुळे तणावाखाली होतो. आगामी फुटबॉल सामन्यात माझा आवडता चेल्सी संघ खेळणार आहे. त्यामुळे मी तणावाखाली आहे.’ त्यांची ही पोस्ट वाचून चाहत्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.






















































