छत्रपती शिवरायांच्या अवमानाविरुद्ध महाराष्ट्र खवळून उठला, राज्यपाल कोश्यारी यांचा सर्वत्र निषेध, आंदोलने

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या अवमानकारक वक्तव्यामुळे महाराष्ट्र खवळून उठला आहे. भगतसिंह कोश्यारी यांनी या प्रकरणी जाहीर माफी मागावी अशी जोरदार मागणी सर्व स्तरांतून होत असून राज्यभरात आंदोलन भडकले आहे. सलग दुसऱया दिवशी मुंबईसह महाराष्ट्रात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा निषेध नोंदवून जोरदार आंदोलन करण्यात आले.

संभाजीनगर दौऱयावर असलेल्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अर्धवट माहितीच्या आधारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले. या वक्तव्यानंतर राज्यभरातील वातावरण ढवळून निघाले. महाविकास आघाडीतील घटक पक्ष शिवसेना, राष्ट्रवादी, काँगेसच्या वतीने ठिकठिकाणी आंदोलने करून राज्यपालांना हटवण्याची मागणी करण्यात आली. शिवसेनेच्या वतीनेही मुंबई शहर, उपनगर तसेच राज्याच्या कानाकोपऱयात आंदोलन करून भगतसिंह कोश्यारी यांचा जाहीर निषेध करण्यात आला.

विक्रोळी-भांडुप-मुलुंड विधानसभा क्षेत्रात शिवसेनेने जोरदार निषेध आंदोलन केले. यावेळी आमदार रमेश कोरगावकर, आमदार सुनील राऊत, विधानसभा संघटक संध्या वढावकर, सर्व नगरसेवक, महिला उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख आणि शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. घाटकोपर येथे विभागप्रमुख राजेंद्र राऊत, विभागसंघटक भारती बावदाने, नगरसेवक सुरेश पाटील, समीक्षा सक्रे यांच्या मार्गदर्शनाखाली जोरदार आंदोलन करण्यात आले.

कुर्ल्यात आमदार संजय पोतनीस यांच्या मार्गदर्शनाखाली जनआंदोलन करण्यात आले. यावेळी कुर्ला विधानसभा आमदार मंगेश कुडाळकर, महिला विभागसंघटक संजना मुणगेकर, कलिना विधानसभा संघटक महेश पेडणेकर, उपविभागप्रमुख संदीप गावडे, बळीराम घाग, नगरसेवक दिनेश कुबल, सगुण नाईक, नगरसेविका सान्वी तांडेल आदी उपस्थित होते. धारावीत खासदार राहुल शेवाळे, विभागप्रमुख/आमदार सदा सरवणकर, महिला विभाग संघटक श्रद्धा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली त्रिकोणी गार्डन येथे राज्यपाल कोश्यारी यांचा निषेध करण्यात आला. यावेळी आरोग्य समिती उपाध्यक्ष- नगरसेवक वसंत नकाशे, धारावी विधानसभा संघटक विठ्ठल पवार, विधानसभासंघटक कविता जाधव आदी उपस्थित होते.

शिवसेना विभाग 1 तर्फे शिवसेना विभागप्रमुख, आमदार विलास पोतनीस यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी माजी आमदार हेमेंद्र मेहता, विभाग संघटक सुजाता शिंगाडे, शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशी, प्रभाग समिती अध्यक्षा सुजाता पाटेकर, शिवसेना प्रवत्त्या संजना घाडी, मागठाणे विधानसभाप्रमुख उदेश पाटेकर आदी उपस्थित होते. दक्षिण मुंबईत विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वाळकेश्वर प्रवेशद्वारावर आंदोलन करण्यात आले.

करी रोड येथे काळे झेंडे दाखवले
करी रोड नाका येथे शिवसेनेच्या वतीने काळे झेंडे दाखवून आंदोलन करण्यात आले. यावेळी पोस्टर्स झळकवून जोरदार घोषणा देण्यात आल्या. राज्यपाल कोश्यारी यांना हटवा असे म्हणत निषेध नोंदवण्यात आला. यावेळी महापौर किशोरी पेडणेकर, आमदार अजय चौधरी, उपनेते सचिन अहिर, माजी आमदार दगडू सकपाळ, विभागप्रमुख आशीष चेंबूरकर, नगरसेविका सिंधू मसुरकर, स्नेहल आंबेकर, सुधीर साळवी आदी मान्यवर उपस्थित होते.

राज्यपाल काय म्हणाले होते…
संभाजीनगर येथे राज्यपाल कोश्यारी यांनी गुरूमुळे शिष्य घडत असतो असे सांगताना छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केला. समर्थ रामदास नसते तर शिवाजी महाराजांना कोणी विचारले असते असे वादग्रस्त वक्तव्य केले. मात्र या वक्तव्याच्या सर्व स्तरांतून झालेल्या निषेधानंतर त्यांनी सारवासारव केली. छत्रपती शिवाजी महाराज हे देशाचे प्रेरणास्रोत आहेत. मला असे वाटले की समर्थ रामदास त्यांचे गुरू आहेत. त्यामुळे मी हा संदर्भ दिला. मात्र याबाबत काही जणांनी मला काही तथ्य सांगितले, त्या तथ्याची मी माहिती घेईन, असे ते म्हणाले.

भगतसिंह कोश्यारींची हकालपट्टी करा
भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्या वक्तव्यावर सारवासारव केली, मात्र माफी न मागितल्याने मुंबईसह राज्यभरात कोश्यारी यांनी राज्यपालपदाचा राजीनामा द्यावा, कोश्यारी यांची हकालपट्टी करा, अशी मागणी केंद्र सरकारकडे ठिकठिकाणी झालेल्या आंदोलनांतून करण्यात आली.

चले जाव चले जाव, राज्यपाल महाराष्ट्रातून चले जाव

काळी टोपी
काळी नीती

भगतसिंह कोश्यारी जी, क्या यही है आपकी होश्यारी, राज्यपाल बिना भाजपा, और भाजप बिना राज्यपाल

दादरमध्ये मोर्चा काढून निषेध नोंदवला
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या निषेधार्थ शाखा क्रमांक 191 च्यावतीने नगरसेविका विशाखा राऊत यांच्या नेतृत्वाखाली शाखा ते शिवसेना भवन येथे निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी शाखाप्रमुख अजित कदम यांच्यासह अनेक शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.