
मोहालीतील आय. एस. बिंद्रा स्टेडियमवरील श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी लढतीचा पहिला दिवस संस्मरणीय घटनांनी गाजला. टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीने आपल्या कसोटी कारकिर्दीतील या 100व्या लढतीत 45 धावांची खेळी करीत 8 हजार धावांचा विक्रमी पल्ला पार केला. असा पराक्रम करणारा तो हिंदुस्थानचा सहावा फलंदाज ठरला आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱया यजमान टीम इंडियाने पहिल्या दिवसअखेर आपल्या पहिल्या डावात 6 बाद 357 अशी दमदार मजल मारली. यष्टिरक्षक रिषभ पंत याने 97 चेंडूंत 96 धावांची धडाकेबाज खेळी केली. पंतचे कसोटी शतक दुर्दैवाने चार धावांनी हुकले. किंग कोहली (45), मयांक अगरवाल (33), हनुमा बिहारी (48) आणि रवींद्र जाडेजा (नाबाद 45) यांच्या शानदार खेळामुळे यजमान संघाला पहिल्या दिवसअखेर त्रिशतकी धावसंख्या गाठता आली.
मोहालीची श्रीलंकन संघाविरुद्धची पहिली कसोटी बऱयाच अर्थांनी संस्मरणीय ठरणार आहे. कारण दोन वर्षांनंतर प्रथमच या लढतीसाठी 50 टक्के क्रिकेटशौकिनांना स्टेडियममध्ये प्रवेश देण्यात आला आहे. शिवाय माजी कर्णधार विराट कोहलीची ही कारकिर्दीतील 100 वी कसोटी लढत आहे. त्यामुळे त्याच्या बॅटमधून बऱयाच दिवसांनी शतकी खेळी साकारेल अशी अपेक्षा त्याचे चाहते बाळगून आहेत.
संक्षिप्त धावफलक
हिंदुस्थान ः पहिला डाव 85 षटकांत 6 बाद 357 (मयांक अग्रवाल 33, हनुमा बिहारी 58, विराट कोहली 45, रिषभ पंत 96, रवींद्र जाडेजा नाबाद 45; सुरंगा लकमल 63 धावांत 1, लसिथ एमूलदेनिया 107 धावांत 2, लाहिरू कुमारा 52 धावांत 1 विकेट).
80 धावांत परतले हिंदुस्थानी सलामीवीर
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीस उतरलेल्या टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा प्रारंभापासूनच आक्रमक मूडमध्ये होता. त्याने लाहिरू कुमारच्या सुमारे ताशी 149 किमी वेगाचे दोन चेंडू सीमारेषेपार धाडले, पण कुमारचा तिसरा उसळत चेंडू सीमारेषेपार टोलवण्याच्या नादात तो 39 धावांतच झेलबाद झाला. त्याला केवळ 29 चेंडूच खेळता आले. संघाचा दुसरा सलामीवीर मयांक अग्रवालनेही 49 चेंडूंत 33 धावांची खेळी करीत संघाला अर्धशतकी धावसंख्येपार नेले. मात्र टीम इंडियाचे दोन्ही सलामीवीर 80 धावांतच तंबूत परतले. त्यानंतर माजी कर्णधार विराट कोहली ( 76 चेंडूंत 45 ) आणि हनुमा बिहारी (128 धावांत 58) यांनी तिसऱया विकेटसाठी 90 धावांची भागीदारी रचत हिंदुस्थानी डाव सावरला.
पंतची बॅट पुन्हा धडाडली
विराट, रोहित, अय्यर, बिहारी हे प्रमुख फलंदाज 228 या धावसंख्येवरच तंबूत परतल्यावर धडाकेबाज रिषभ पंतची बॅट चौकार आणि षटकारांच्या फटक्यांनी धडाडली. त्याने 9 चौकार व 4 षटकार नोंदवत 97 चेंडूंत 96 धावांची धडाकेबाज खेळी केली. पंत आणि नाबाद 45 धावांची खेळी करणारा अष्टपैलू रवींद्र जाडेजा यांनी सहाव्या विकेटसाठी 104 धावांची शतकी भागीदारी रचत संघाला सव्वातीनशे धावांचा भक्कम पल्ला गाठून दिला.मात्र पंत आपल्या शानदार कसोटी शतकापासून मात्र 4 धावांनी वंचित राहिला. त्याला वेगवान गोलंदाज सुरंगा लकमलने त्रिफळाचीत केले. पंत तंबूत परतल्यानंतर दिवसअखेर टीम इंडियाने 85 षटकांत पहिल्या डावात 6 बाद 357 अशी मजल मारली. रवींद्र जाडेजा 45 धावांवर, तर रविचंद्रन अश्वीन 10 धावांवर नाबाद होते.



























































