आरोग्य : सायलेंट हार्ट अॅटॅकचा धोका म्हणजे काय?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. बिपीनचंद्र भामरे

सायलेंट हार्ट अॅटॅक… ऐकून वेगळंच वाटलं असेल ना! हृदयविकाराचा झटका येऊन गेला तरी कळले नाही. हो, हे खरंय. कारण हा एक सायलेंट हार्ट अॅटॅक असू शकतो. ज्यामध्ये छातीत दुखणे, घाम येणे, श्वास अडखळणे आणि चक्कर येणे यासारखी हृदयविकाराची सामान्य लक्षणे दिसून येत नाहीत. या लेखाच्या माध्यमातून सायलेंट हार्ट अॅटॅकविषयी प्रबोधन करण्याचा प्रयत्न आहे.

सायलेंट हार्ट अॅटॅक (सायलेंट इस्केमिया) हा हृदयविकाराचा झटका आहे, ज्यामध्ये कोणतीही लक्षणे नसतात, किमान लक्षणे किंवा वेगळीच नवी लक्षणे आढळून येऊ शकतात. लक्षणे न दिसून आल्याने अनेक लोकांना काही आठवडे किंवा महिन्यांपर्यंत हृदयविकाराचा झटका आल्याचे कळूनही येत नाही आणि दुर्लक्ष केले जाते.

सायलेंट (मूक) हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणेः

फ्लू किंवा छातीत तणाव जाणवणे, जबडा दुखणे, प्रचंड थकवा येणे, अपचन, छातीत दुखणे, धाप लागणे, अंग थंडगार पडणे, डोके दुखणे, मळमळ, उलटय़ा होणे आणि छातीत जळजळ झाल्यासारखे वाटू शकते.

जोखीम घटक ः तुम्ही लठ्ठ असाल, शारीरिकदृष्टय़ा निक्रिय असाल, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, उच्च कोलेस्टेरॉल, मधुमेह, तणाव किंवा तंबाखूचे सेवन केल्यास तुम्हाला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

कारणे कोणती

हृदयातील अवरोधित धमनीमुळे ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे हृदयाच्या स्नायूचा काही भाग खराब झाल्यास सायलेंट हार्ट अॅटॅकचा धोका उद्भवू शकतो. इतर कारणांमुळे जसे की वय, हृदयविकाराचा कौटुंबिक इतिहास असणे आणि पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना हा धोका अधिक असतो.

निदान ः ईसीजी अथवा ईकेजी (इलेक्ट्रोकार्डियोग्राम) जी एक विशेष अल्ट्रासाऊंड तपासणी आहे, किंवा तुमच्या हृदयाचा सिटी स्कॅन अथवा एमआरआय तज्ञांना हृदयविकाराचा झटका आहे की नाही हे समजण्यास मदत करू शकते.

गुंतागुंत ः यामध्ये अनेकदा दुसरा हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो, जो प्राणघातक असू शकतो. दुसऱयांदा हृदयविकाराचा झटका आल्यानेदेखील हार्ट फेल्युअरचा धोका उद्भवू शकतो.

उपचार ः बीटा-ब्लॉकर्स, स्टॅटिन किंवा एसीई इनहिबिटर तुम्हाला लिहून दिले जाऊ शकतात. तुम्ही फक्त डॉक्टरांनी सुचवलेले औषध घ्यावे. कोरोनरी अँजिओप्लास्टीदेखील केली जाऊ शकते आणि हृदयाला सुरळीत रक्तप्रवाह सुनिश्चित करण्यासाठी स्टेंट मदत करेल. हृदयविकाराचा झटका आलेल्या व्यक्तीवर उपचार न केल्यास शेवटी जीव देखील गमवावा लागतो.

हृदयविकाराचा झटका कसा टाळू शकता ः संतुलित आहार घेऊन, धूम्रपान आणि मद्यपान सोडून, तणाव नियंत्रित करून, दररोज व्यायाम करून, रक्तदाब, रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करून, इष्टतम वजन राखून तुम्ही तुमचे हृदय निरोगी ठेवू शकता. आणि नियमित हृदय तपासणी करून घ्या. कोणत्याही असामान्य लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका तसेच तुमच्या हृदयाच्या आरोग्याकडे लक्ष द्या आणि वैद्यकीय मदत घ्या.

(लेखक सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, सल्लागार कार्डियाक सर्जन आहेत)