स्मृतिगंध 20 वर्षे रखडलेला तलाव, सुधीरभाऊंमुळे ‘पाझर’ फुटला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> गजानन चेणगे

शिवसेना नेते सुधीर जोशी यांचे नुकतेच निधन झाले. मुंबईचे महापौर, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आणि नंतर युती शासनात महसूल व शिक्षण खात्याचे मंत्री अशा सर्व भूमिकांना त्यांनी आपल्या अभ्यास, चिंतन, वत्तृत्वाच्या ताकदीवर खऱया अर्थाने न्याय देण्याचा प्रयत्न केला. विरोधी पक्षनेते असताना सातारा जिल्ह्यातील निगडीसारख्या दूर ग्रामीण भागातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पांचा प्रश्न त्यांनी विधिमंडळात मांडला आणि सोडवला. त्यांनी त्यांच्या कारकीर्दीत केलेले काम तेथील जनतेच्या कायम स्मरणात राहील.

महाराष्ट्रात 1972 च्या दुष्काळावेळी लोकांच्या हाताला काम मिळावे आणि त्या माध्यमातून लोकांचा भाकरीचा प्रश्न सुटावा म्हणून सरकारने रोजगार हमी योजनेची कामे सुरू केली होती. कालांतराने दुष्काळाची तीव्रता कमी झाल्यानंतर हाती घेतलेली क्वचित काही कामे पूर्ण झाली, तर बहुतांशी कामे तशीच दुर्लक्षित राहिली. निगडीचा पाझर तलाव हा त्यापैकीच एक. या तलावाचे अकुशल मनुष्यबळातून करून घ्यायचे 60 टक्के काम पूर्ण झाले. दोन्ही टोकांकडून भराव घालून घेण्याचे ते काम होते, पण बुआर्ज पोर्शन अर्थात धार तुंबण्याचे 40 टक्के काम झालेच नाही. हे काम कुशल मनुष्यबळातून करून घ्यायचे असते. अर्थात सरकारने या कामासाठी निविदा काढून कंत्राटदाराकडून काम करून घ्यायला हवे होते, पण त्याकडे सरकारचे साफ दुर्लक्ष झाले. नंतर तब्बल वीस वर्षे उलटली. किती सरकारे आली – गेली, पण त्यांनीही या कामाकडे पाहिले नाही. शेकडो लोकांनी ज्या कामासाठी घाम गाळला होता, झालेल्या कामासाठी शासनाचा पैसा पाण्यासारखा खर्च झाला होता, पण धार तुंबण्याचे महत्वाचे काम न झाल्यामुळे हा पैसा पाण्यात गेला होता.

कराड तालुक्यातील निगडी गावचे तत्कालीन सरपंच दिनकरराव पाटील यांनी याबाबत मला माहिती दिली, मी त्यावेळी पत्रकारितेच्या माध्यमातून आपल्या भागातील दुर्लक्षित आणि महत्त्वाची कामे याबाबत राज्यकर्त्यांचे, प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करीत होतो. मला हे काम त्या ठिकाणी जाऊन पाहायचे होते, त्या विषयाची तीव्रता समजून येण्यासाठी ते आवश्यक होते. कल्पना करून विषय मांडणे आणि त्याची प्रत्यक्ष अनुभूती घेऊन त्याला हात घालणे यात बराच फरक पडतो. चटके अनुभकल्याशिवाय त्याची दाहकता कळत नाही, त्याचप्रमाणे विषय काळजाला भिडल्याशिवाय त्याची परिणामकारकता शब्दात उतरत नाही. त्यामुळे तो तलाव पाहायला जाऊ असे मी त्यांना म्हणालो. त्यांनी लागलीच त्या ठिकाणी जाण्याची व्यवस्था केली.

जलसंधारणाची कसलीच कामे झालेली नसल्यामुळे ‘नेमेचि येतो मग पावसाळा’ या उक्तीप्रमाणे धो-धो पाऊस पडतो आणि दाणादाण उडते, ओढा तुडुंब भरून वाहतो आणि नंतर आठ महिने पाण्याचा ठणठणपाळ. शेती पावसाच्या लहरीवर आणि शेतकऱ्याचा हवाला हरीवर. पिकलं तर पिकलं, नाहीतर पोटासाठी घरातलं विकलं अशी अवस्था. त्या परिसरात गेलो तेव्हा हे दुर्दैवाचे दशावतार समोर आले. सगळा परिसर ओसाड. त्याच्या कोलाजवर अर्धवट पडलेल्या पाझर तलावाचे चित्र भेसूर वाटत होते. 1972 पासून थोडाथोडका नव्हे, तर दोन दशकांचा काळ उलटून गेल्यावर याहून वेगळे काय दिसणार? हा संपूर्ण परिसर पायी तुडवताना दिनकर आबा हा विषय मला समजावून सांगत होते. त्यांना माझ्यामध्ये आशेचा किरण दिसला असावा. कदाचित काय सांगावे, या पाझर तलावाच्या उद्धाराची वेळही समीप आली असावी.

डोक्यात विचारांचे चक्र सुरू झाले. पाझर तलावाचे काम पूर्ण झाल्यास परिसराचे नंदनवन होईल, परिसरातील विहिरींना पाझर फुटेल. त्यातून या ठिकाणी बागायती क्षेत्र काढेल. आजूबाजूच्या शेतीला प्रत्यक्ष सिंचनाचा लाभ होईल. पर्यायाने शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य येईल असा विश्वास वाटला. यासाठी माझ्यापरीने जास्तीत जास्त पाठपुरावा करण्याचा शब्द मी दिनकरराव पाटील यांना दिला. त्याप्रमाणे हा विषय वृत्तपत्रात लावून धरला.

याचदरम्यान विधान परिषदेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते सुधीरभाऊ जोशी यांचा सातारा जिल्हा दौरा झाला. लोकांच्या प्रश्नांवर सदनात आवाज उठवणारे ते अभ्यासू नेते होते. या दौऱ्यात त्यांनी निगडी पाझर तलावाला भेट दिली आणि हा विषय त्यांच्या डोक्यात बसला तर कदाचित प्रदीर्घकाळ प्रलंबित राहिलेला हा प्रकल्प मार्गी लागू शकेल असा विचार डोक्यात आला. त्याप्रमाणे चंद्रकांत पवार यांच्याशी चर्चा करून मी सुधीर जोशी यांच्या दौऱ्यात ऐनवेळी निगडीचा समावेश करून घेण्यात यशस्वी झालो. या पाझर तलावाचे स्वप्न साकार होण्यासाठीच्या प्रयत्नातील हा एक मैलाचा दगड ठरला. नियोजनाप्रमाणे ठरल्या दिवशी सुधीर जोशी निगडीला आले. मुंबईचे माजी महापौर शरद आचार्य, जिल्हाप्रमुख चंद्रकांत पवार, हणमंतराव यादव त्यांच्या सोबत होते. आणि अर्थातच मीदेखील त्या तलावाचे अर्धवट पडलेले काम दाखवण्यासाठी गेलो होतो. त्याविषयी तयार केलेली टिपणी सोबत घेतली होती. निगडीपासून पाझर तलावापर्यंतची वाट खाचखळग्यांची व खडतर होती. त्यामुळे तिथपर्यंत पोहोचण्यासाठी बैलगाडीची व्यवस्था केली होती. सुधीरभाऊ बैलगाडीतून जाताना सगळा परिसर न्याहाळत होते. विरोधी पक्षनेते पाझर तलावाची पाहणी करण्यासाठी येणार असल्यामुळे संबंधित विभागाचे अधिकारीही उपस्थित होते. 1972 च्या दुष्काळापासून इतकी वर्षे कोणीच कसे या विषयाकडे लक्ष दिले नाही याचे सुधीरभाऊंना आश्चर्य वाटत होते. या विषयाची त्यांनी विशेष दखल घेतल्याचे एकूण संवादातून जाणवत होते.

दौऱ्यावरून परत गेल्यानंतर सुधीरभाऊ जोशी यांनी 1972 च्या दुष्काळावेळी हाती घेण्यात आलेल्या व नंतर अर्धवट पडून राहिलेल्या राज्यभरातील सर्वच प्रलंबित प्रकल्पांची माहिती प्रयत्नपूर्वक गोळा केली. रखडलेल्या अनेक प्रकल्पांची पाहणी करून त्यांनी त्यासंदर्भातील अहवाल निष्कर्ष पुस्तिकेद्वारे शासनाला सादर केला. 1992 च्या नागपूरला झालेल्या हिवाळी अधिवेशनात त्यांनी या विषयावरून सरकारला धारेवर धरले. विधिमंडळात खडाजंगी झाली. शेवटी तत्कालीन सभापती मधुकरराव चौधरी यांनी यामध्ये हस्तक्षेप करून रखडलेले प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश सरकारला दिले. निगडी पाझर तलावासाठी तब्बल 36 लाख रुपयांचा निधी सरकारने मंजूर केला. प्रत्यक्ष कामालाही सुरुवात झाली. स्कप्नवत वाटणारे हे डोंगराएवढे काम सत्यात उतरले. निगडी परिसराच्या हरितक्रांतीचा पाया या कामाने रचला गेला. वृत्तपत्रीय लिखाणातून सुरू झालेल्या या लढय़ावर सुधीरभाऊ जोशी यांच्यासारख्या द्रष्टय़ा नेत्यामुळे नागपुरात कळस चढला म्हणून मसूर, निगडी परिसराला, त्याचप्रमाणे महाराष्ट्राला त्यांचे हे ऋण कधीही विसरून चालणार नाही. वैयक्तिक माझ्या दृष्टीने तर हे संचित आयुष्यभरासाठी संस्मरणीय ठरले. कारण या प्रचंड यशामुळे माझ्या कॉलेज जीवनातच आयुष्यातील अत्युच्च अभिमानाचा, सन्मानाचा आणि आनंदाचा क्षण वाटय़ाला आला. 26 जानेवारी 1993 या दिवशी निगडी गावचे मुख्य ध्कजारोहण करण्याचा बहुमान मला त्या गावाने अगत्यपूर्वक दिला. गावाच्यावतीने मानपत्र देऊन माझा सत्कार केला गेला. हे भाग्य सुधीरभाऊ जोशी यांच्यामुळेच लाभले.