
>>शिरीष कणेकर
सकाळचे अकरा वाजले होते. अभावितपणे, नकळत, यांत्रिकपणे माझा हात फोनकडे गेला व विजेचा झटका बसल्यासारखा मागे आला. काय करीत होतो मी? कोणाला फोन करीत होतो?
लताचं व माझं ठरलं होतं की अकरा वाजता मी तिला फोन करायचा. त्या वेळी ती बहुधा मोकळी असे. तिच्यावरील वैद्यकीय अत्याचारही थांबलेले असत. ती उत्साहानं बोलायची. आता माझ्या लक्षात येतंय की, आपल्या आजाराविषयी, त्रासांविषयी, भोगायला लागत असलेल्या यातनांविषयी ती कधी चकार शब्दही काढत नसे. मग मीही मुद्दाम उकरून काढत नसे. एकदा बोलताना तिचा आवाज मला फ्रेश वाटला. म्हणजेच तब्येत चांगली होती.
‘दीदी, आवाज चांगला वाटतोय.’ मी म्हणालो.
‘आवाजाला काय धाड भरल्येय?’ ती फणकाऱ्यानं म्हणाली. त्र्याण्णवव्या वर्षी आवाजाला काय धाड भरल्येय, हे म्हणणे केवळ लता मंगेशकरलाच शक्य होतं. तिनं वृद्धत्व व त्या अनुषंगानं येणारी दुखणी पाहिली होती, तिच्या आवाजानं पाहिली नव्हती. त्या तरुण आवाजामागे धावताना तिची दमछाक होत होती. ती पार थकली होती, पण तिचा आवाज म्हणत होता, ‘आज मैं जवाँ हो गयी हूँ!’
एक लता-भक्त बंगाली गायिका तिला भेटायला आली होती. ती उमाळय़ानं लताला म्हणाली, ‘मी तुमची भांडी घासीन.’
‘कशाला?’ लता म्हणाली, ‘आहे आमच्याकडे भांडी घासायला बाई. त्यापेक्षा तू गाणी गा.’
‘शिरीष, या क्षणी मला सज्जादचं ‘खेल’मधलं ‘जाते हो तो जाओ’ ऐकायची इच्छा झाल्येय. काय करू?’
‘एक मिनिट थांबत असाल तर पाठवतो.’ मी म्हणालो.
‘तुमच्याकडे माझी जवळ जवळ सगळी गाणी आहेत का हो?’ तिनं मला एकदा दबून विचारलं.
‘छे हो, काहीतरी काय? पण भाबडय़ा वाचकांसमोर मी असा आभास निर्माण केलाय.’
लता तिच्या प्रथेप्रमाणे हसत सुटली.
एकदा माझ्या एकपात्री प्रयोगाला रवींद्र नाटय़मंदिरमध्ये मंचावरून खाली उतरता उतरता आशा भोसले माईकवरून म्हणाली होती, ‘त्यांना खरं म्हणजे दीदीचं गाणं आवडतं. पाहिजे तर विचारा त्यांना. मग प्रमुख पाहुणी म्हणून मला का बोलावतात कळत नाही.’
प्रेक्षकांनी (व मीही) आशाच्या फटकळपणाला हसून दाद दिली होती. मी लतावाला आहे हे आशाला ज्ञात होतं व मान्यही होतं.
‘दीदी, मी तुमची सगळी भारी भारी गाणी – मराठी, हिंदी, बंगाली सगळी – स्वतःच्या आवाजात रेकॉर्ड करणार आणि लतावरदेखील मात करता येते हे मी जगाला दाखवून देणार आहे.’ मी फोनवर म्हणालो.
‘नको नको, प्लीज नको. असं काही करू नका. रहेम मेरे आका रहेम…’ लता अजिजीनं म्हणाली.
‘बरं, ठीक आहे. तुम्ही एवढं मिनतवारीनं सांगताय तर जाओ बक्ष दिया.’ मी म्हणालो.
इतके किस्से, इतक्या गमती मी तिच्याकडून ऐकल्यात की कुठल्या सांगू व कुठल्या नको असं मला झालंय. वाचा.
संगीतकार शंकरकडे दरवर्षी गणपती बसायचा. गणपतीसमोर छान छान दर्जेदार गाण्यांच्या मैफिली होत. (अशाच एका मैफिलीत दाटीवाटीनं जमिनीवर बसलेल्या निमंत्रितात दिलीपकुमार लतासमोर चहाचा कप धरतोय, असा एक अतिदुर्मिळ फोटो माझ्याकडे आहे. टुकटुक टुकटुक!) लता शंकरकडे गेली तर दारातच बाहेर पडणारी शंकरची आंग्रे घराण्याचा वारसा सांगणारी बायको भेटली.
‘हे काय वहिनी, बाहेर निघालात?’ लतानं तिला विचारलं.
‘काय करणार?’ ती नाकाचा कानोला करून म्हणाली, ‘कोण थांबेल? घरी सगळे फिल्मी लोक येणार.’
लता चक्रावून गेली. फिल्मी लोक? मग तुझा नवरा कोण आहे?
एका जाहीर कार्यक्रमात लता ‘ऐ मेरे वतन के लोगो’ गाणार होती. तत्पूर्वी अण्णांनी (सी. रामचंद्र) तिला सांगितलं की, गायच्या आधी डोळय़ाखाली थोडा बाम लाव.’
‘का?’ लतानं आश्चर्यानं विचारलं.
‘म्हणजे गाताना तुझ्या डोळय़ात पाणी येईल व ते पाहून श्रोते भारावतील.’ अण्णांनी बामचं प्रयोजन सांगितलं.
लतानं अर्थातच तसं काही केलं नाही. ‘श्रोते भारावावेत यासाठी असल्या काही ट्रिक्स करण्याची देवदयेनं मला कधीच गरज भासली नाही.’ लता म्हणाली.
दिल्लीत पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरूंच्या घरात राज कपूर पंडितजींना म्हणाला, ‘मला तुमची बेडरूम पाहायची आहे.’ सगळे वैतागले. दिलीपकुमार तर कमालीचा भडकला होता. पंतप्रधानांशी असं बोलतात? पण ते पंतप्रधान असले तर हा राज कपूर होता…
घडय़ाळात अकरा वाजून गेलेत. ते रोजच वाजणार आहेत. रोजच माझा हात अकरा वाजता नकळत फोनकडे जाणार आहे का? हे थांबवायला हवं. की नाहीच कधी थांबणार? लताचा वेडा नुसताच वेडा होणार नाही ना…?


























































