ग्रामसंस्कृती – रानभटकी माणसं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रणव पाटील

जांभळ्या आभाळाखाली गार वारा ओपीत रानभटकी माणसं भटकत असतात. आडोशाला रानदेवाचं ठाणं पाखळ पूजेनं पावन झालेलं. कंबरेला फलाटणीत कोयता अडकवून लगबगीनं जाणारी माणसं कशाचा तरी शोध घेत रानवाट धुंडाळतात. येता जाता रस्त्यात माजलेलं कारवीचं रान मोकळं करत जातात. या वेळी रानात कुठं पांगारा फुललेला असतो तर कुठं करवंदाच्या जाळ्यात लहान लहान करवंदी आणि अजून पिकायच्या बाकी असलेल्या आंबोळ्या. आता माघी पौर्णिमेनंतर रानात फारशी गर्दी नाय. जरा दिस कलला की कुठं आडोशाला कातवडय़ांचा वावर रानटी जनावरांचा शोध घेत सुरू असतो. कुडाच्या त्यांच्या झापात इकडून तिकडून वारा फटी शोधत बाहेर पडतो. वावटून उठली म्हणजे त्यांच्या दोन-चार तकलादू झापा आडव्या पडतात. कातकऱ्यांना झाडपाल्यांचे विशेष ज्ञान. कुणाला काही दुखलं खुपलं की रानातून कसली तरी औषधी आणतील, पण नाव सांगायचे नाहीत. पाऊस काळात त्यांची मासे, खेकडे पकडण्याची धावपळ सुरू असते. तेव्हा मात्र त्यांना तोंड उघडायलाबी वेळ नसतो. इतर वेळी तरी ते कुठं फार बोलतात!

चारापाण्याच्या शोधातले धनगर पाणवठय़ावर विसावतात तेव्हा त्यांना विचारायच्या कथा आणि व्यथा. चहुबाजूच्या मुलखात फिरून चांगले हुशार झालेले असतात. बोलता बोलता पिढ्यानपिढ्या जपलेल्या कहाण्या ते सांगता त्या नोंदवायच्या. कधी त्यांच्या वाडीतून जाणं झालं की, ताका दह्याने पाहुणचार केल्याशिवाय राहायचे नाहीत. रानात चरणाऱ्या त्यांच्या गुरांची राखण करणाऱ्या वाघजाई देवीवर त्यांची विशेष श्रद्धा.

जरा उन्हाळा वाढला की रानात मोहाच्या फुलांचा वास रान जागवतो. डोंगर कोळी या मोहाच्या फुलांबरोबर रानात कुठं बेहडा, हिरडा गोळा करीत फिरतात. शिडशिडीत बांध्याचे रापलेल्या रंगाचे डोंगरकोळी म्हणजे कसल्याही सरळसोट झाडाला अन् डोंगरकडय़ाला यंगून सरसर चढतील. कधी पारधी होऊन जाळ्या घेऊन जंगल धुंडाळत फिरतील.

ठाकर कधी भेटतील म्हणून वाट बघतो, पण ठाकर येत नाहीत. आज त्यांची माघी पौर्णिमा ते तिकडं कुठंतरी तालावर थिरकत असतील. त्यांचा नाद अजून मला पाहता आला नाही. रानातली माणसं रानवटच. ती कधी वेळेला भेटायची नाहीत. कधी नीट बोलायची नाहीत. त्यांचं घडय़ाळ वेगळंच असतं. त्यांचा दिवस पण वेगळाच. कधी कॅलेंडर नाय पाहायची, पण वेळेवर हजर व्हायची. रानभटक्या माणसांचं इथल्या रहाळावर जीव असतो. हिरव्या झाडाला कधी नख लावायची नाहीत. इथल्या प्रत्येक पाणवठय़ावर, झाडाझुडपात, बांधावर, चढावर, उतारावर त्यांच्या देवांची ठाणी आहेत. प्रत्येक वेळी त्यांना भेटतो तेव्हा वाटत राहतं अजून बरंच शोधायचं राहिलंय.

– [email protected]