
एका सामूहिक बलात्कार पीडितेला दलित असल्यामुळे नुकसान भरपाई देऊन तिला गप्प राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. हा संतापजनक प्रकार बिहारमध्ये उघड झाला आहे. ही पीडिता अल्पवयीन आहे.
या घटनेतील एका आरोपीला अटक करण्यात आली असून त्याचे सहकारी फरार आहेत. सहरसा जिल्ह्यात राहणारी ही पीडिता 24 फेब्रुवारी रोजी एका रॅलीतून घरी परतत होती. त्याच वेळी सरफराज नावाच्या माणसाने सहकाऱ्यांसह तिचं अपहरण केलं. तिला पळवून ते मक्याच्या शेतात घेऊन गेले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला.
जेव्हा या मुलीने आपल्यावर गुदरलेला प्रसंग तिच्या आईला सांगितला तेव्हा तिच्या आईने गावातील पंचायतीकडे जाऊन या प्रकाराबद्दल दाद मागितली. मात्र, पीडिता दलित असल्याने या ग्राम पंचायत सदस्यांनी तिला 70 हजार रुपये घेऊन हे प्रकरण पुढे न वाढवण्याविषयी सांगितलं. या प्रकाराने संतापलेल्या पीडितेच्या आईने पोलिसात धाव घेतली. पण पोलिसांनीही तिची तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिल्याचा आरोप तिने केला आहे.
यानंतर तिने एका एनजीओच्या माध्यमातून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे आपली तक्रार सांगितली. जिल्ह्याच्या मुख्य पोलीस अधीक्षकांनी यावर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यांच्या आदेशावरून सूत्र हलली असून सरफराजला अटक करण्यात आली आहे. त्याच्या साथीदारांचा शोध सुरू असून नुकसान भरपाई देऊ पाहणाऱ्या ग्राम पंचायत सदस्यांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे.




























































