
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुणे मेट्रोला हिरवा झेंडा दाखवत गरवारे कॉलेज ते आनंदनगरदरम्यान मेट्रोने प्रवास केला. या प्रवासात त्यांनी दिव्यांगासह शाळकरी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. पुणे मेट्रोचे भूमिपूजन आणि लोकार्पणाचे भाग्य मला मिळाले. पूर्वीच्या काळात भूमिपूजन होऊन उद्घाटन कधी होणार, याची शाश्वती नसायची. पुणे मेट्रो प्रकल्पामुळे एक संदेश जातो की, योजना वेळेवर पूर्ण होऊ शकतात, असे प्रतिपादन नरेंद्र मोदी यांनी केले. आपल्या पुणे दौऱयात पंतप्रधानांनी पुण्यातील विविध विकासकामांचे लोकार्पण केले.
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘2014 पर्यंत दिल्ली आणि एनसीआरमध्येच मेट्रोचा विस्तार झाला. आता देशातील दोन डझन शहरांत मेट्रोचे काम सुरू असून, काही ठिकाणी मेट्रो धावत आहे. 2030 पर्यंत शहरांची लोकसंख्या 60 कोटींच्या पार जाईल. देशभरात शहरीकरण वेगाने होत असून, त्यामुळे उद्भवणाऱया वाहतूक समस्येवर मास ट्रान्स्पोर्टेशन हा उपाय आहे. पुणे शहर अध्यात्मिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रप्रेमाच्या प्रेरणेसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे आधुनिक सुविधा गरजेच्या असून, सरकार त्यासाठी कटिबद्ध आहे.
पहिल्याच दिवशी मेट्रो डब्याच्या काचांना तडे
पिंपरी ते फुगेवाडी दरम्यान धावणाऱया मेट्रोच्या दोन डब्यांच्या काचांना तडे गेल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता मेट्रो सुरू करण्यास घाई करण्यात आली का असा सवाल उपस्थित होत आहे. ही बाब मेट्रोच्या अधिकाऱयांच्या लक्षात आल्यानंतर सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. हा देखभालीची भाग असल्याचे अधिकाऱयांनी सांगितले. रविवारी रात्री ते बदलले जातील असेही मेट्रोच्या अधिकाऱयांनी सांगितले. आमच्या देखभालीच्या पायाभूत सुविधा सर्व तयार आहेत. मेट्रोची दररोज देखभाल होणार आहे. काचांना तडे गेल्याचे तपासून पाहण्यात येईल, असे अधिकारी म्हणाले.
काळ्या रंगाची धास्ती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एमआयटी महाविद्यालयातील सभेला येणाऱया लोकांसाठी काळा रंग वर्ज्य ठरविण्यात आला. ज्यांनी काळ्या रंगाचा शर्ट घातला असेल, त्यांना तो काढण्यास सांगण्यात आले. एवढेच नाही, तर ज्यांनी शर्टच्या आतमध्ये काळ्या रंगाची बनियन आणि तोंडावरील मास्क, पायात काळ्या रंगाचे मोजे घातले असतील, त्यांनाही ते काढण्यास सांगण्यात आले. त्यामुळे पंतप्रधान मोदींच्या सभेत प्रशासनाने काळ्या रंगाची धास्ती घेतल्याचे दिसून आले.




























































