
केंद्र सरकारच्या 15व्या वित्त आयोगातून दोन वर्षांत जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना 374 कोटी रुपयांचा निधी वर्ग झाला आहे. तर, पंचायत समिती व जिल्हा परिषदेला प्रत्येकी 10 टक्क्यांप्रमाणे 46 कोटी 78 लाखांचा निधी मिळाला आहे. गेल्या दोन वर्षांत सहा हप्त्यांत 467 कोटींचा हा निधी केंद्राकडून जिल्हा परिषदेला व जिल्हा परिषदेकडून पंचायत समिती व ग्रामपंचायतींना वर्ग करण्यात आला आहे. यामुळे खऱया अर्थाने ग्रामपंचायती मालामाल झाल्याचे दिसत आहे.
पंधराव्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतींना 80 टक्के, तर जिल्हा परिषद व पंचायत समितीला प्रत्येकी 10 टक्केप्रमाणे रक्कम विकासकामांसाठी मिळते. 2020 ते 2025 या पाच वर्षांत 15व्या वित्त आयोगाचा निधी उपलब्ध होणार आहे. त्यानुसार 2020-21 व 2021-22 (नोव्हेंबर 21 अखेर) या दोन आर्थिक वर्षांत एकूण 467 कोटी 80 लाख 70 हजार 775 रुपयांचा निधी शासनाकडून प्राप्त झाला. यातून एकूण सहा हप्त्यांत टाईड व अनटाईड असा ग्रामपंचायतींना 374 कोटी 23 लाख 51 हजार 793 रुपये, तर पंचायत समिती व जिल्हा परिषदेला प्रत्येकी 46 कोटी 78 लाख 29 हजार एवढा निधीवाटप करण्यात आला आहे.
नगर जिल्ह्यात 1 हजार 318 ग्रामपंचायती असून, वित्त आयोगाच्या निधीचे ग्रामपंचायतींना लोकसंख्येच्या प्रमाणात वाटप होते. जिल्ह्याची ग्रामीण लोकसंख्या 36 लाख आहे. आतापर्यंत 15व्या वित्त आयोगाचे 374 कोटी 23 लाख रुपये ग्रामपंचायतींना वाटप करण्यात आले आहे. या रकमेला 36 लाख लोकसंख्येने भाग घातल्यास प्रतिमाणसी 1 हजार 39 रुपये एवढा समान वाटा येतो. एखाद्या गावाची लोकसंख्या 10 हजार असेल तर त्या गावाला सुमारे 1 कोटी 4 हजारांचा निधी मिळालेला आहे.
19 ग्रामपंचायतींना अडचणी
15व्या वित्त आयोगाच्या निधीसाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला आयसीआयसीआय बँकेतच खाते उघडण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यानुसार ग्रामपंचायती हे खाते उघडत आहेत; परंतु काही बँकांना केवायसीच्या अडचणी येत आहेत. जिल्ह्यात बहुतांश ग्रामपंचायतींनी असे खाते उघडले असून, केवळ 19 ग्रामपंचायतींना अडचणी आहेत. त्यामुळे त्यांना अद्यापि हा निधी वर्ग झालेला नाही.
आतापर्यंत सहा हप्ते
15व्या वित्त आयोगाचा निधी अनटाईड व टाईड अशा दोनप्रकारचा असतो. अनटाईड निधी गावातील विकासकामांच्या गरजेनुसार वापरला जातो, तर टाईड निधी हा शासनाकडून ठरविण्यात आलेल्या फक्त ठराविक कामांसाठीच खर्च करायचा असतो. आतापर्यंत अनटाईडचे तीन व टाईड निधीचे तीन हप्ते प्राप्त झाले आहेत.


























































