
2003च्या क्रिकेट विश्वचषकात हिंदुस्थानी क्रिकेट संघ स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. दिग्गज खेळाडूंनी सजलेला संघ हा त्या वेळचं विशेष आकर्षण होता. त्या खेरीज तमाम प्रेक्षकांसाठी अजून एक खास आकर्षण ठरली होती ती म्हणजे त्या स्पर्धेत निवेदक म्हणून काम करणारी अभिनेत्री मंदिरा बेदी.
मंदिरा बेदी ही त्यावेळी या स्पर्धेच्या अधिकृत ब्रॉडकास्टर असलेल्या सोनी मॅक्स या वाहिनीच्या एक्स्ट्रा इनिंग्जचं निवेदन करत होती. तिचं निवेदन त्यावेळी प्रेक्षकांना प्रचंड आवडलं होतं. पण, या सगळ्यामागे घडणाऱ्या घटना काहीतरी वेगळ्याच असल्याचं मंदिराचं म्हणणं आहे. तिने जवळपास 19 वर्षांनंतर त्यावेळी घडलेल्या काही त्रासदायक आठवणी उघड केल्या आहेत.
मंदिराच्या म्हणण्यानुसार, ती जेव्हा क्रिकेटपटूंना प्रश्न विचारायची तेव्हा तिला रागाने पाहिलं जायचं. त्यांच्या नजरेत, ही काय विचारतेय, का विचारतेय असे भाव असायचे. ते ज्यावेळी उत्तर द्यायचे तेव्हा ते उत्तर प्रश्नाशी संपूर्ण विसंगत असायचं. हा अनुभव धक्कादायक होता. माझा आत्मविश्वास डळमळायला लागला होता. पण, ब्रॉडकास्टर्स मंडळाने माझ्यावर विश्वास ठेवला. मी त्यांच्यासाठी बेस्ट असल्याचं सांगितलं, असं मंदिराचं म्हणणं आहे.
तिच्या म्हणण्यानुसार, एक साडी परिधान केलेली महिला क्रिकेट संबंधी प्रश्न विचारते, हे बहुधा अनेक क्रिकेटपटूंना सहन व्हायचं नाही. ते तिचा स्वीकार करू शकत नव्हते, त्यामुळे तिला अशी वागणूक मिळाली, असं मंदिराचंं म्हणणं आहे.


























































