
यूट्युब पाहून रेसिपी, डीआयवाय, मेकअप या विषयांमध्ये अनेक जण कौशल्या मिळवताना दिसतात. पण, मध्य प्रदेशमध्ये दोन अल्पवयीन मुलांनी यूट्युब पाहून हत्यारं बनवली आहेत.
मध्य प्रदेशच्या जबलपूर येथे ही घटना उघडकीला आली आहे. येथील धन्वंतरी नगर परिसरात सुरू असलेल्या वाहन तपासणी दरम्यान पोलिसांनी दोन अल्पवयीनांना ताब्यात घेतलं होतं. कारण, त्या दोघांकडे कट्टा आणि चाकू आढळले होते. त्यामुळे पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली.
चौकशीत काही धक्कादायक गोष्टी उघड झाल्या. ही दोन्ही मुलं हनुमान ताल इथे राहणारी होती आणि घातक हत्यारं बनवून विकण्याचं काम करत होती. या दोघांपैकी एकाचे वडील इलेक्ट्रिशियन म्हणून काम करतात. त्यामुळे बरचंस सामान त्याच्या घरात होतं. त्याचा वापर करून ते यूट्युबवरचे व्हिडीओ पाहून ते दोघं हत्यारं बनवायला शिकले.
हे दोघेही आधीपासूनच गुन्हेगारी वृत्तीचे असल्याचं पोलिसांनी केलेल्या चौकशीत आढळलं. त्यामुळे त्यांच्या माहितीवरून या मुलांच्या घरात धाड टाकण्यात आली. या धाडीत त्यांना हत्यारांची फॅक्टरी आढळली. पोलिसांनी या धाडीत तीन कट्टे, आठ तलवारी, बॉम्ब, ड्रील मशीन, वेल्डिंग मशिन, ग्राइंडर कटर इत्यादींसह हत्यारं बनवण्यात उपयोगी पडणारं अन्य साहित्य जप्त केलं आहे.
आतापर्यंत या मुलांनी चाकू, तलवार अशी हत्यारं बनवली होती. आता या मुलांना बंदुकीची गोळी बनवायची होती. पोलिसांनी या दोघांनाही अटक केली असून त्यांनी आतापर्यंत कुणाकुणाला हत्यारं विकली आहेत, याची माहिती काढण्याचं काम सुरू आहे.
























































