अलविदा वॉर्नी…!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> नितीन राणे

तो आला… तो खेळला…

आणि तो जिंकला…!

तो आला… तो जगला…

आणि तो जिंकला…!

तो… अकस्मात शांत झाला…

तो गेला… आणि… तो जिंकला…!

खऱ्या अर्थाने ज्यांना ‘फिरकीचा जादूगार’ म्हणावेत असे अगदी हाताच्या बोटावर मोजावे इतकेच फिरकी गोलंदाज क्रिकेट जगताने आणि रसिकांनी पाहिले. कोणी चेंडूला अतिशय नियंत्रित आणि अचूक  उंची, दिशा, टप्पा देण्यात वाप्बगार होते तर काही होते चेंडूला भिंगरीसारखे फिरवणारे. खेळपट्टीची स्थिती ओळखून हे सारे जादूगार फलंदाजांना आपल्या बोटावर नाचवायचे. अशा जादूगार गोलंदाजांची, जाणकारांनी किंवा क्रीडारसिकांनी, सर्वकालीन अशी यादी केली तर कमी-अधिक फरकाने ही यादी जवळपास सारखीच असेल आणि काही नावे त्या यादीत निर्विवादपणे असतील.

वेस्ट इंडीजचा लान्स गिब्ज या फिरकी गोलंदाजाने साठीच्या दशकात अशक्यप्राय वाटावी अशी कामगिरी करत 300 कसोटी बळींचा टप्पा गाठला. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच फिरकी गोलंदाज!

त्यानंतर आजपर्यंत 300 कसोटी बळी घेणाऱया एकूण 36 गोलंदाजांमध्ये केवळ 7 फिरकी गोलंदाजांचा समावेश आहे. मात्र या 36 पैकी पहिल्या पाच गोलंदाजांत तीन (मुरलीधरन, वॉर्न आणि पुंबळे) फिरकी गोलंदाज आहेत ही बाब नक्कीच विशेष आहे. वेगवान गोलंदाजांच्या तुलनेत फिरकी गोलंदाजांची कारकीर्द थोडी अधिक चालते हे जरी मान्य केले तरीही मुरलीच्या 800 आणि वॉर्नच्या 708 बळींचा हा डोंगर पार करणे इथून पुढे अगदीच अशक्यप्राय वाटते.

आपल्या या अभूतपूर्व कामगिरीने सर्वकालीन सर्वश्रेष्ठ अशा तीन क्रिकेटपटूंपैकी एक ठरावा अशा शेन वॉर्नने आकस्मिकपणे इहलोकाचा आणि क्रीडारसिकांचा निरोप घेतला.

आपल्या कर्तृत्वाचा प्रचंड मोठा डोंगर मागे ठेवून हा अवलिया त्याच्या आजवरच्या स्वभावाला अनुसरून धक्कादायकपणे देवाघरी निघून गेला.

SHANE  या नावाचा एक अर्थ होतो ” Graced by God”!

किती यथार्थ ठरलं ते नाव… नाही?

ही त्याच्या आईवडिलांची दूरदृष्टी होती.

की हे त्याचं प्राक्तन होतं.

की वॉर्नने आपल्या नावाच्या अर्थाला आपल्या पराक्रमाने सिद्ध केलं कोणास ठाऊक…!

पण जे त्याने करून दाखवलं ते अभूतपूर्व असंच ठरलं हे मात्र खरं!

जगभरातील प्रतिभावंत, दिग्गज, कर्तृत्वाने मोठे, अनुभवी खेळाडू, तज्ञ, क्रिकेटपंडित, समालोचक, क्रीडा पत्रकार आणि अर्थातच क्रिकेटरसिक या सर्वांच्याच मनात वॉर्नचा एक लेगस्पिनर म्हणून असलेल्या दर्जाविषयी कुठलाही किंतु नाही. त्याचं हे स्थान निर्विवाद आहे. पण काही मोजके आणि अपवादात्मक असे जुने खेळाडू/तज्ञ वॉर्नला आजवरचा ‘सर्वोत्तम’ लेगस्पिनर गोलंदाज मानायला नकार देतात. असेल त्यांचं विशेष असं काही आकलन..असोत बापडे…!

पण तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य क्रिकेटप्रेमींसाठी ‘वॉर्नी’ सर्वोत्कृष्टच होता… आहे आणि राहील!

कारण होऊन गेलेल्या गोलंदाजांना आपण प्रत्यक्ष पाहिलेलं नाही.

वॉर्नच्या निवृत्तीनंतर त्याच्या जवळपास जाणारा तर सोडाच, पण त्याच्या नखाचीही सर असावी असा कोणी गोलंदाज सांप्रत दिसत नाही. पुढे भविष्यात काय होईल ते आपल्याला माहिती नाही. त्यामुळे आपल्यासाठी शेन वॉर्न हाच आजवरचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरावा.

एखादा रग्बी खेळाडूची वाटावी अशी शरीरयष्टी त्याची, पण देहबोलीत जराशीही आक्रमकता नसायची.. फक्त तीन किंवा चार पावलांवरून चक्क चालत येत… अगदी सहज अशा शैलीत तो चेंडू टाकायचा.

अगदी नुकतंच हातात बॅट धरायला शिकलेल्या एखाद्या तीन-चार वर्षांच्या पोटच्या लेकराला ज्या हळुवारपणे एखादा बाबा बॉलिंग करेल तसा काहीसा वॉर्नीचा रनअप आणि आविर्भाव असायचा. अगदी रमतगमत चालत येत, चेहऱयावर पुसटसं हसू आणि मिश्कील भाव ठेवत जीभ तोंडाच्या उजव्या बाजूने किंचित बाहेर काढत… चेंडू टाकायच्या अगदी शेवटच्या क्षणाला एक हुंकार भरत…चेंडू सोडायचा.

पण दिसायला हे सारं जितपं सहज आणि साधं भासायचं तसं खचितच नसायचं. लेगस्पिनर गोलंदाजांची अभिजात म्हणावी अशा शैलीत टाकलेल्या आणि शेवटच्या क्षणी त्या हुंकारासोबतच मनगटाच्या झटक्याने त्या चेंडूत भरला जायचा तो लेगस्पिनर, टॉपस्पिनर, गुगली किंवा फ्लिपर नावाचा विध्वंसक दारूगोळा… जवळपास एकाच अॅक्शनने ही करामत वॉर्नी करायचा. बदल असायचा तो चेंडूची उंची, दिशा, वेग आणि त्याच्या टप्प्यात आणि अर्थातच प्रत्येक चेंडूसाठी, त्याच्या कुशाग्र बुद्धीने आखलेल्या डावपेचात. अगदी बेमालूमपणे हे बदल मनातल्या योजनेप्रमाणे केले जायचे. खेळपट्टी कशीही असली तरी चेंडू हवा तेवढा वळवायची दैवी देणगी वॉर्नीच्या जबरदस्त पंजात होती.

कारकीर्दीच्या सुरुवातीला फिटनेसकडे आणि आपल्या अंगी असलेल्या गोलंदाजीच्या दैवी गुणांकडे त्याने फारसे गांभीर्याने पाहिले नसावे. त्यामुळे रवी शास्त्राr आणि सिद्धूसारख्या सर्वसामान्य फलंदाजांनीही त्याच्या गोलंदाजीवर हात धुऊन घेतले.

मुळात लेगस्पिन ही केवळ गोलंदाजी नव्हे, तर ती कला आहे. एक अतिशय खडतर व्रत आहे. अत्यंत मनोभावे, न उतता, न मातता करण्याजोगी अशी एक उपासना! एखाद्या योग्याने एखादी दैवी विद्या प्राप्त करण्यासाठी करावी अशी उपासना… जी चुकली तर त्या देवतेचा कोप ठरलेला. त्याची शिक्षा भोगावी लागावी अशी उपासना!

‘भुलभुलैया’मधल्या अवनीशी (विद्या बालन) लग्न करून सुखी आयुष्याच्या कल्पना करणाऱया शायनी आहुजाला आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाला जसं अचानक ‘मंजुलिका’च्या भुताचा सामना करावा लागतो अन् त्यांच्या जिवावर बेततं ना… तसंच असावं काहीसं लेगस्पिन गोलंदाजाचं आयुष्य! नीट जमलं तर स्वर्ग, नाहीतर मृत्यूशीच गाठ!

पण वॉर्नीचा लेगस्पिन कलेसोबतचा हा सहप्रवास अविस्मरणीय अन् चिरस्मरणीय ठरला! मनगटाच्या तुलनेत बोटांनी चेंडूची दिशा, उंची, टप्पा यावर नियंत्रण राखणं स्वाभाविकपणे सोपं असतं. त्यामुळेच अनियंत्रित लेगस्पिनर चांगल्या दर्जेदार फलंदाजांकडून बुकलला जातो. पण वॉर्नसारखा अफाट गुणवत्तेचा गोलंदाज अगदी दर्जेदार फलंदाजांचीदेखील काय अवस्था करू शकतो याची हजारेक उदाहरणं वॉर्नने आपल्या कारकीर्दीत पेश केली आहेत.

माईक गॅटिंगला दीङमूढ करत त्याचा ऑफ स्टंप उडवणारा चेंडू म्हणूनच ‘शतकातील सर्वोत्तम चेंडू’ म्हणून गौरवला गेला आहे.

मला व्यक्तिशः वॉर्नने डावखुऱया फलंदाजांना (त्यांच्या) ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू टाकत त्रिफळाचीत (पक्षीः चारीमुंडय़ा चीत) करणारे चेंडू माईक गॅटिंगला टाकलेल्या चेंडूपेक्षा जास्त भावतात. लेगस्टंपबाहेर पडून पुण्यातल्या एखाद्या मोटरसायकल्स्वारासारखा भस्सकन काटकोनात वळणारा चेंडू नजरेआड असतो; पण डावखुऱया फलंदाजाला तोच चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर पडून आत येतो तेव्हा नजरेच्या टप्प्यात असतो. पण तरीही वॉर्नी नावाचा जादूगार भूल टाकल्यागत फलंदाजांना लीलया चकवायचा आणि मागे लाकडं वाजायची!

याच्या भजनी लागलं की चिपळय़ा वाजल्याच म्हणून समजा!

अफाट पैसा, प्रसिद्धी, लोकप्रियता मिळवत क्रिकेट जगतात सर्वार्थाने शिखरावर पोहचूनही आपलं आचरण, विचार, सवयी, संयम यावर नियंत्रण ठेवणं एक खेळाडूच नव्हे, तर एक माणूस आणि पुत्र, पती, पिता या भूमिकामध्येही आदर्शवत राहणं हे करू शकणारा सचिन तेंडुलकर विरळाच!

विलक्षण गुणी असा हा वॉर्नी मैदानाबाहेरच्या त्याच्या खासगी आयुष्यात मात्र बेलगाम आयुष्याचा धनी होता. अफाट पैसा, प्रसिद्धी, लोकप्रियतेमुळे तमाम जगाचं लक्ष त्याच्यावरच खिळलेलं असायचं. तरीही याला आचरणाच्या सीमारेषांमध्ये कधीच जमलं नाही. शबाब और शराब हेच याचं मैदानाबाहेरचं आयुष्य होतं. सदोदित कुठल्या ना कुठल्या वादविवादात तो अडकत राहिला.. त्याचे व्हायचे ते दुष्परिणामही भोगावे लागलेच, पण पठ्ठा ….. असाच राहिला. मौजमस्ती करतच जगला… आणि अचानक निघूनही गेला!

आपल्याकडे आता उरला आहे त्या त्याच्या अद्वितीय कारकीर्दीतल्या अविस्मरणीय अन् चिरंतन पराक्रमाचा ठेवा..!

अलविदा वॉर्नी…!