
पुण्याच्या शीतल महाजन यांनी महिला दिन अनोख्या पद्धतीने साजरा केला. रात्रीच्या अंधारात शीतलने पॅरामोटर्सच्या सहाय्याने अवकाशातून 5 हजार फुटांवरून स्काय डायव्हिंग केले. हडपसर येथील पॅराग्लायडिंग सेंटरमधून शीतलने ही उडी घेतली.
मोहिमेच्या वेळी शीतलने तिरंग्यासारखा वेश परिधान केला होता. त्याला लायटिंग करण्यात आले होते. मोहिमेत उद्योगपती विजय सेठी यांनी पॅरामोटर्सच्या पायलटची जबाबदारी पार पाडली. 8 मार्च रोजी रात्री 7.55 ते 8. 20 या 25 मिनिटांच्या अवधीत हा विक्रम झाला. पॅरामोटरमधून पॅराजम्पिंग करणारी ती पहिलीच हिंदुस्थानी महिला आहे. रात्रीच्या वेळेस पॅराजम्पिंगचाही हा पहिला विक्रम आहे.
सेठ हे पॅरामोटर इन्स्ट्रक्टर असून आम्ही जमिनीपासून आकाशात पाच हजार फुटांवर गेलो. तिथे मी पॅरामोटरमधून बाहेर पडत झेप घेतली. जमिनीच्या दिशेने वेगाने येत असतानाच पाच हजार फुट उंचीवर मी पॅराशूट उघडले. मी खाली बघितले. तो अनुभव शब्दातीत होता. नाईट स्काय डायव्हिंग हा भन्नाट प्रकार आहे, एकदा तरी केला पहिजे, अशा भावना शीतल यांनी व्यक्त केल्या.
स्काय डायव्हिंग, पॅराग्लायडिंग, पॅरामोटर्स यांच्या राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय स्पर्धा होत असतात. अनेकांना त्याबद्दल माहीत नाही. या खेळात अधिकाधिक युवकांनी सहभागी होत देशाचे प्रतिनिधित्व करावे, असा सल्ला त्यांनी दिला आहे.
n सामान्य कुटुंबातील शीतलने स्काय डायव्हिंगमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्या सहभागी झाल्या आहेत. आतापर्यंत शीतलच्या नावावर 18 राष्ट्रीय आणि सहा जागतिक विक्रम आहेत. जगातील सात खंडांमध्ये स्काय डायव्हिंग करणारी ती पहिला हिंदुस्थानी महिला आहे. याची दखल घेत फेडरेशन ऑफ ऍरोनॉटिकल इंटरनॅशनलने सुवर्णपदक देऊन त्यांचा सन्मान केला आहे.





























































