
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका कधी होणार याबाबत सद्यस्थितीत अनिश्चितता असली तरी पालिकेने मात्र आवश्यक काम वेगात सुरूच ठेवले आहे. यामध्ये बूथ, मतदार केंद्रांमध्ये लागणाऱया साहित्याच्या खरेदीसाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात येत असून वॉर्डनिहाय मतदारयाद्या अपडेट करण्याचे काम सुरू असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
मुंबई महानगरपालिकेच्या 2017 च्या निवडणुकीत निवडून आलेल्या नगरसेवकांची मुदत 7 मार्च रोजी संपली.याआधी निवडणूक होणे गरजेचे होते. मात्र आधी कोरोना आणि त्यानंतर प्रशासकीय कारणांनी निवडणूक पुढे ढकलली गेली आहे. मात्र प्रशासकीय निर्णय कोणत्याही क्षणी आला तरी आपली यंत्रणा तैनात ठेवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. यामध्ये निवडणुकीसाठी आवश्यक साहित्याच्या खरेदीसाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात येत आहे.
पुरवठादारांकडून दराबाबत हमीपत्र घेणार
पुरवठादारांकडून वाढीव किंमत मागण्याचा प्रकार टाळण्यासाठी त्यांच्याकडून हमीपत्र घेण्यात येणार आहे.
खरेदी आणि निविदा प्रक्रियेसाठी 18 झोनमध्ये विभागणी करून प्रकिया राबवण्यात येत आहे. यानुसार त्यांना आताच्याच दराने वस्तूंचा पुरवठा करावा लागणार आहे.
यामध्ये कुठल्याही पुरवठादाराने नकार दिल्यास दोन नंबरवर असणाऱया कंत्राटदाराकडून वस्तूंचा पुरवठा करून घेण्यात येईल.
































































