सुरक्षित मुंबईसाठी प्रत्येक वॉर्डात डिझास्टर ऍक्शन स्कॉड; धोके तपासणार, उपाययोजना सुचवणार, जनजागृतीही करणार 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सुरक्षित मुंबईसाठी पालिका आता प्रत्येक वॉर्डमध्ये विशेष ‘डिझास्टर ऍक्शन स्कॉड’ सुरू करणार आहे. शिफ्ट इनचार्जसह तीन असिस्टंट-कॉल ऑपरेटर, फायर ऑफिसर आणि सुरक्षा रक्षकाचा या टीमध्ये समावेश असेल. ही टीम आपल्या वॉर्डमध्ये ठिकठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन संभाव्य धोके ओळखून खबरदारीच्या उपाययोजना सुचवणार आहे.

मुंबईला सुरक्षित शहर बनवण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून अनेक उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. यामध्ये प्रदूषण कमी करण्यासाठी मुंबई वातावरण कृती आराखड्यानुसार काम सुरू करण्यात आले. शिवाय इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. याचबरोबर दुर्घटना कमी करण्यासाठी आता आपत्कालीन विभागाच्या समन्वयाने प्रत्येक वॉर्डमध्ये शिफ्ट इनचार्जच्या नेतृत्वाखाली  विशेष डिझास्टर टीम तैनात करण्यात येणार आहे. यामध्ये डिझास्टर मॅनेजमेंटचा पदव्युत्तर पदवी घेतलेल्या तज्ञाची शिफ्ट इनचार्ज म्हणून नेमणूक केली जाईल.

मुंबईत 27 प्रकारचे धोके

मुंबईत नैसर्गिक आणि दुर्घटना मिळून तब्बल 27 प्रकारचे धोके आहेत. यामध्ये अतिवृष्टी, पूर, वायू गळती, दरड कोसळणे, डोंगर खचणे, रस्ता खचणे अशा नैसर्गिक आपत्तींसह आग लागणे, इमारत कोसळणे, बॉम्ब स्फोट, रेल्वे दुर्घटना, वाहनांचे अपघात अशा प्रकारचे 27 प्रकारचे धोके मुंबईत आहेत. पालिकेच्या वॉर्डमधील ही टीम धोके कमी करण्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे.