सातारा एमआयडीसीतील 13 कोटींचा अपहार, चोरीप्रकरण; आर्थिक गुन्हे शाखेकडून आणखी दोघांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सातारा येथील एमआयडीसीतील युटोपिया कंपनीतील 13 कोटी 64 लाख 71 हजार 876 रुपयांच्या चोरी, अपहारप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने आणखी दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले असता, त्यांना 16 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

समीर शंकर वाघ (रा. कोटेश्वर कॉलनी, सातारा) व राहुल दिगंबर गोळविलकर (रा. यादोगोपाळ पेठ, सातारा) अशी अटक केलेल्या व पोलीस कोठडी मिळालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी प्रसन्न देशमुख यांनी 19 जणांविरुद्ध तक्रार दिली आहे.

तक्रारदार प्रसन्न देशमुख व एका संशयित आरोपीसोबत सातारा एमआयडीसीमध्ये भागीदारीमध्ये युटोपिया कंपनी आहे. मात्र, पार्टनरने इतर संशयित आरोपी यांना हाताशी धरून कंपनीतील ट्रेडमार्क असलेले डिझायनिंग चोरले. कंपनीचे उत्पादन कमी पैशात घेऊन ते बाहेर मार्केटमध्ये अवाजवी किमतीला विकून कंपनीचे नुकसान केले. तसेच, अस्तित्वात नसलेल्या कंपनीला सॉफ्टवेअरची ऑर्डर दिली असे दाखवून कंपनीतील रक्कम लांबवली. बिलामध्ये फेरफार करणे, बनावट शेल नावाने कंपनी अस्तित्वात आणून त्याद्वारे रक्कम काढणे अशी बेकायदा कृत्ये करत 14 कोटी रुपयांची फसवणूक केली.

याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पुढे याचा तपास सातारा आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला. गेल्या तीन महिन्यांपासून याप्रकरणी अटकसत्राची कारवाई सुरू आहे. दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले असता, पोलीस कोठडी मिळाली. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक मोहन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी भोसले, पोलीस हवालदार संजय मोरे, मनोज जाधव यांनी केली.