
सॅण्डहर्स्ट रोड येथील हँकाँक पुलाचे बांधकाम थांबू नये यासाठी दोन टप्प्यांत पुलाचे बांधकाम करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील बांधकाम पूर्ण करण्यासाठी सात इमारतींमधील 630 कुटुंबीयांना स्थलांतरित करण्याची आवश्यकता नाही, अशी माहिती नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी विधानसभेत दिली.
सॅण्डहर्स्ट रोड रेल्वे स्थानकाजवळील शिवदास चापसी मार्गावरील रेल्वे मार्गावरील हँकाँक पुलाच्या दुहेरी रुंदीकरणाच्या अतिरिक्त बांधकामामुळे तसेच वॉलेस फ्लोअर मिल ते सकिना मंझिलदरम्यान रस्ता रुंदीकरणामुळे सात इमारतींमधील 630 रहिवासी बाधित होत असल्याबद्दल शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. रस्ता रुंदीकरणामध्ये बाधित इमारतींचे सर्वेक्षण करण्यास सहकार्य करण्याची विनंती इमारतींच्या अध्यक्ष-सचिवांना केल्याचे शिंदे यांनी लेखी उत्तरात सांगितले.

























































