देशविदेश : मानवतेचा पराभव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अनिल साखरे

रशिया-युक्रेन या देशांमध्ये 24 फेब्रुवारीपासून घनघोर युद्धाला सुरुवात झाली असून खरे तर हे जगातील दोन महासत्तांमधील भांडण आहे आणि त्यामध्ये युक्रेनचा नाहक बळी जात आहे. केवळ युक्रेनचे ‘नाटो’मध्ये सामील होणे एवढाच या युद्धाचा मुद्दा नसून आणखीही काही मुद्दे आहेत, ते म्हणजे तेल आणि नैसर्गिक गॅस. कारण रशिया हा तेल आणि गॅसचा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा उत्पादक आणि निर्यातदार देश आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव वाढले की, रशिया, सौदी अरेबिया आणि इतर मध्य आशियाई राष्ट्रांच्या तिजोरीत भरभरून पैसे वाढतात. तेलाचे भाव कमी झाले तर सौदी अरेबिया आणि इतर अरब राष्ट्रांचे अमेरिकेवरील अवलंबित्व वाढते. मग रशिया आपल्या वाटय़ाचे तेल बाजारात आणून भाव स्थिर राहतील असे बघतो. त्यातच रशियाने मागील दोन वर्षांमध्ये नैसर्गिक वायू वाहण्यासाठी पाइपलाइन थेट जर्मनीच्या दारात नेऊन ठेवली. तो प्रकल्प आता पूर्ण झाला असून त्यामधून आता प्रत्यक्ष गॅस वाहतूक सुरू होणार होती. त्यामुळे संपूर्ण युरोपीय बाजारपेठ रशियाला मिळणार, हे अमेरिकेला खटकत होते. त्यासोबत युक्रेनमध्ये लिथियम या खनिजाचा प्रचंड प्रमाणात साठा सापडलेला असून लिथियमचा उपयोग हा मोबाईल बॅटरी, लॅपटॉप आणि इलेक्ट्रिकल कार निर्मितीमध्ये मोठय़ा प्रमाणावर होणार आहे. या खनिजावर एकीकडे अमेरिका, युरोपला आपले वर्चस्व निर्माण करायचे आहे, तर दुसरीकडे रशियाही लिथियमवर डोळा ठेवून आहे.

पुतीन हे पूर्वाश्रमीचे रशियाची गुप्तचर संस्था केजीबीचे प्रमुख. त्यामुळे कुठल्याही घटनेची आखणी करताना, त्याची  पूर्वतयारी, प्रत्यक्ष घटनाकाल आणि त्यानंतर त्या घटनेचे होणारे संभाव्य परिणाम या सगळ्यांचा विचार करूनच पुतीन यांनी युक्रेनवर आक्रमण केले आहे. या युद्धामुळे एक गहन प्रश्न निर्माण केला आहे तो म्हणजे मानवी जीवन हे बंदुकीच्या टोकवरतीच राहणार आहे का? या युद्धाची परिणिती जागतिक महायुद्धात होणार का? अण्वस्त्र्ाांचा वापर होऊन या पृथ्वीवरील मानवी जीवन पुन्हा बेचिराख होणार का? या प्रश्नांचे उत्तर तूर्त तरी कोणाकडेच नाही. ज्यांनी ते द्यायचे आहे ते देश सध्या युद्धखोरीमध्ये मश्गुल आहेत. दिवसेंदिवस रशिया-युक्रेन युद्धाची वाटचाल आणखी एका जागतिक युद्धाच्या दिशेने सुरू आहे, असेच चित्र आहे.

– [email protected]