भाजपचा ‘जलील’ डाव उधळला, एमआयएमची युतीची ऑफर महाविकास आघाडीने धुडकावली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

निवडणुकीच्या राजकारणात भाजपची बी टीम अशीच ओळख असणाऱया ऑल इंडिया मजलीस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन अर्थात एमआयएमला हाताशी धरून महाराष्ट्रात ‘जलील’ डाव खेळण्याचा भाजपचा प्रयत्न उधळला गेला आहे. ‘एमआयएम’चे प्रदेशाध्यक्ष, खासदार इम्तियाज जलील यांनी आज अचानक राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसबरोबर युतीची ऑफर दिली. त्यानंतर राज्यात राजकीय चर्चा रंगली. मात्र, काही तासांतच महाविकास आघाडीतील महत्त्वाच्या नेत्यांनी ही ऑफर सपशेल धुडकावली आहे. यामुळे भाजपचे मनसुबे उधळले गेले.

‘एमआयएम’चे प्रदेशाध्यक्ष, संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांच्या आईचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जलील यांची निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीदरम्यान जलील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसबरोबरच युती करण्याचा प्रस्ताव ठेवल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांनी एमआयएमबरोबरच्या युतीचा प्रस्ताव धुडकावला आहे. मात्र, या ‘जलील’ ऑफरमागे भाजपचा डाव होता अशीही चर्चा सुरू आहे.

राजकीय प्रश्नांवर कुणाला एकत्र काम करायचे असेल, राज्याचे भले होणार असेल तर ही चांगली गोष्ट आहे. इम्तियाज जलील आणि राजेश टोपे यांच्यात नेमकी काय चर्चा झाली याची माहिती माझ्याकडे नाही. संपूर्ण विषय समजून घेतल्यावर त्यावर बोलणे सयुक्तिक ठरेल.
n सुप्रिया सुळे
(खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस)

आतापर्यंत आम्ही कधीच एमआयएमचा पाठिंबा घेतलेला नाही. त्यांना पाठिंबा देण्याचा आताच का साक्षात्कार झाला? यामागे कोणाची काही चाल आहे का हे तपासले पाहिजे.
n हसन मुश्रीफ
(ग्रामविकासमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस नेते)

आमच्यावर आरोप करण्यात येतात की एमआयएममुळे भाजप जिंकले. एमआयएम भाजपची बी टीम आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते भेटायला आले असता त्यांना मी ऑफर दिली आहे. तुम्ही (राष्ट्रवादी) आमच्याबरोबर युती करायला तयार आहात का? त्यावर ते काही बोलत नाहीत. काँग्रेसलाही युतीची ऑफर आम्ही देत आहोत.
– इम्तियाज जलील (प्रदेशाध्यक्ष एमआयएम)

एमआयएम ही भाजपची बी टीम असल्याचे उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालमध्ये पाहिले आहे. जे औरंगजेबाच्या कबरीपुढे गुडघे टेकतात ते कोणीही असोत, महाराष्ट्राचे, शिवसेनेचे आणि राज्यातील कोणत्याही पक्षाचे आदर्श होऊ शकत नाहीत. ज्यांच्याबरोबर त्यांची छुपी हातमिळवणी आहे, ती त्यांना लखलाभ ठरो.
– संजय राऊत (शिवसेना नेते, खासदार)

इम्तियाज जलील यांच्या मातोश्रींचे निधन झाले म्हणून त्यांना भेटण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे गेले होते. अशावेळी राजकीय चर्चा करणे अभिप्रत नाही आणि मला खात्री आहे, राजेश टोपेंनी ती केली नसेल. एमआयएमने आधी ते भाजपची बी टीम नाही हे सिद्ध करून दाखवावे. भाजपच्या पराभवासाठी ते उत्सुक आहेत की विजयासाठी?
z जयंत पाटील (प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस)

कोणताच कट्टरतावाद काँग्रेसला मान्य नसून सर्वधर्मसमभाव मानणारा आमचा विचार आहे. राज्यघटनेच्या मूलभूत तत्त्वांवर ज्यांची निष्ठा आहे त्यांना सोबत घेऊन आम्ही काम करणार आहोत. राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थिर आणि भक्कम आहे. 2024 मध्ये पुन्हा महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येईल, असा विश्वास आहे.
z बाळासाहेब थोरात (महसूलमंत्री, काँग्रेस)