
पुणेकरांनो सावधान…तुम्ही जर रात्री-अपरात्री उशिरा टेकडी परिसरात फिरण्यासाठी घराबाहेर पडत असल्यास खबरदारी घेणे गरजेचे आहे. अन्यथा चोरट्यांकडून तुम्हाला ऑनलाईनरित्या गंडा घालण्याची शक्यता आहे. अशीच एक घटना सुसखिंड परिसरातील पाषाण टेकडीवर 18 मार्चला घडली आहे.
मैत्रिणीसोबत गप्पा मारत बसलेल्या तरुणाला टोळक्याने मारहाण करून ऑनलाईनरित्या दोघांना लुटले. आरोपींनी दोघांच्या बँकखात्यातून ऑनलाईनरित्या तब्बल 76 हजार रूपये वर्ग करून घेत फसवणूक केली आहे. याप्रकरणी यश (वय 25, रा. पिंपरी ) यांनी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यश हे खासगी कंपनीत कामाला असून 18 मार्चला ते मैत्रिणीसोबत सुसखिंड परिसरातील पाषाण टेकडीवर गप्पा मारत बसले होते. त्यावेळी आलेल्या तिघा चोरट्यांनी त्यांना तुम्ही कुठले आहात, इथे काय करता असे म्हणत मारहाण केली. त्यांना दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली.
त्यानंतर टोळक्याने यश यांच्या बँकखात्यातून तब्बल 40 हजार रूपये ऑनलाइनरित्या वर्ग करून घेतले. त्याच्या मैत्रिणीकडूनही 36 हजार रूपये ट्रान्सफर करून घेत ऑनलाइनरित्या लूट केली आहे. त्यामुळे व्यायामासाठी टेकडीवर जाणाऱ्या नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
यापूर्वीही टेकडीवर लुटमारीच्या घटना
शहरातील सुस पाषाण टेकडीसह विविध टेकड्यांवर लुटमारीच्या घटना याआधीही घडल्या आहेत. एकटे जोडपे दिसल्यास त्यांना टारगेट करून पैशांसाठी खूनी हल्ल्याचे प्रकारही घडले आहेत. विशेषतः महिला, मुलींसह जोडप्यांवर हल्ला करून लुटमार केल्याचे उघडकीस आले आहेत.
रात्री-अपरात्री टेकडीवर जाणे टाळाच
शहरातील बहुतांश टेकडी परिसरात व्यायामासाठी जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र, अंधार पडल्यानंतर त्याठिकाणी झोपडपट्टीतील काहीजणांकडून भाईगिरीसह दादागिरी केली जाते. विशेषतः रात्री-अपरात्री जोडपे आढळून आल्यानंतर त्यांना मारहाण केल्याच्या घटना यापुर्वीही घडल्या आहेत. मात्र, चोरट्यांकडून आता ऑनलाईनरित्याही लुटमारीच्या घटनांमुळे चिंता व्यक्त केली जात आहे.
टेकडीवर बसलेल्या दोघांकडून आरोपींनी ऑनलाईनरित्या रक्कम वर्ग करून घेत, त्यांचे मोबाईल फोडून टाकले आहेत. याप्रकरणी आरोपींचा शोध सुरू असून, नागरिकांनी टेकडी परिसरात आडमार्गाला जाऊ नये, रात्री उशिरापर्यंत परिसरात थांबू नये.
संतोष कोळी, सहायक पोलीस निरीक्षक, चतुःशृंगी पोलीस ठाणे



























































