अपहरण झालेल्या 34 मुलांची घरवापसी; बोईसर पोलिसांची कामगिरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कधी चॉकलेटचा बहाणा… तर कधी हरवलेल्या मुलांना घरी सोडतो असे सांगून अल्पवयीन मुलांचे अपहरण केले जाते. यामुळे पालकांचे टेन्शन वाढते. या मुलांना शोधायचे तरी कुठे, असा मोठा प्रश्न पालकांसमोर उभा राहतो. अशा अपहरण झालेल्या 34 अल्पवयीन मुलांना बोईसर पोलिसांनी शोधून काढले आहे. 2021 मध्ये अपहरण झालेल्या 36 मुलांपैकी 34 मुलांची सुटका करण्यात बोईसर पोलिसांना यश आले आहे. आपल्या मुलांना पाहताच पालकांच्या चेहऱ्यावर हसू फुलले.

बोईसर तारापूर हे प्रमुख औद्योगिक शहर असल्याने लाखो परप्रांतीय कामगार या ठिकाणी राहतात. वाढत्या लोकसंख्येमुळे चोऱ्या, घरफोडी, अपहरण, अंमली पदार्थ विक्री, बलात्कार आणि हत्या यांसारख्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. बोईसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या वर्षी 9 मुले आणि 27 मुली अशा एकूण 36 अल्पवयीन मुलांचे अपहरण झाल्याची नोंद करण्यात आली होती. याची गंभीर दखल घेत बोईसर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सुरेश कदम, उपनिरीक्षक विजय डाखोरे, योगेश खोंडे व त्यांच्या पथकाने कौशल्यपूर्ण तपास करीत 36 पैकी 34 मुला-मुलींचा शोध लावला. त्यांना त्यांच्या कुटुंबीयाकडे सुखरूप सुपूर्द केले. यामध्ये एका मुलाचे अपहरण करून हत्या करण्यात आली तर 1 मुलीवर शारीरिक अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

असा लावला छडा…
बोईसर तारापूर परिसरातून 2 मुले आणि 11 मुली, तर जिल्ह्यातून 2 मुले आणि 5 मुली, महाराष्ट्राबाहेरील गुजरात, बिहार, उत्तर प्रदेशसारख्या राज्यांतून व दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशात जाऊन कौशल्यपूर्ण तपास करीत 4 मुले आणि 11 मुलींचा शोध लावत बोईसर पोलिसांनी मुलांना सुखरूप पालकांच्या स्वाधीन केले.